yuva MAharashtra ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जत तालुक्यातील केमिस्ट संघटना आक्रमक | आज एकदिवसीय बंद; तालुक्यातील ३८० मेडिकल दुकाने राहणार बंद

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जत तालुक्यातील केमिस्ट संघटना आक्रमक | आज एकदिवसीय बंद; तालुक्यातील ३८० मेडिकल दुकाने राहणार बंद

जत वार्ता न्यूज
By -

बेकायदेशीर ऑनलाईन विक्रीमुळे समाजाला धोका; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन


जत/प्रतिनिधी :
     बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कार्पोरेट क्षेत्राकडून होत असलेल्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये जत तालुका केमिस्ट असोसिएशनने सहभाग घेतला असून आज तालुक्यातील सुमारे ३८० मेडिकल दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष सुनील घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     यावेळी संघटनेचे सुरेश पट्टणशेट्टी, संचालक भगवान पवार, सहसंचालक राजू आरळी, संचालिका सोनाली जमशेट्टी, सेक्रेटरी राजू कोळी, स्वप्नील सरगर, सुनील कदम, शिवराज मोटे, रवी ऐनापुरे तसेच इतर सदस्य उपस्थित होते. आंदोलनासंदर्भात पोलीस आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले असून विविध संघटनांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
     पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुनील घाटगे म्हणाले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. १५ ते १९ मे या कालावधीत औषध विक्रेते काळ्या फिती लावून निषेध नोंदवत आहेत, तर २० मे रोजी देशव्यापी बंद पाळण्यात येत आहे. राज्यातील सुमारे दीड लाख औषध दुकाने तसेच सांगली जिल्ह्यातील ४२०० दुकाने या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. जत तालुक्यातील ३८० सभासद मेडिकल दुकानेही बंद राहतील.
     तथापि, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपत्कालीन औषधांची व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
     संचालक भगवान पवार यांनी ऑनलाईन औषध विक्रीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त केली. “ऑनलाईन ही सर्वच क्षेत्रातील कीड बनली आहे. केवळ केमिस्ट व्यावसायिकांचे नुकसान होत नाही, तर समाजालाही त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. ऑनलाईन माध्यमातून बनावट औषधे, शेड्युल H1 औषधे, गर्भनिरोधक गोळ्या तसेच नशेची औषधे सहज उपलब्ध होत आहेत. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून अशा समाजविघातक ऑनलाईन विक्रीला आळा घालण्यासाठी सरकारचे लक्ष वेधणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
     दरम्यान, ऑनलाईन औषध विक्रीविरोधातील या आंदोलनामुळे आरोग्य क्षेत्रातील नियमन आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.