yuva MAharashtra खलाटीतील दुर्घटनाग्रस्त शेजूळ कुटुंबीयांना विद्या मोटे यांचा आधार; साध्य फाउंडेशनकडून आर्थिक मदत

खलाटीतील दुर्घटनाग्रस्त शेजूळ कुटुंबीयांना विद्या मोटे यांचा आधार; साध्य फाउंडेशनकडून आर्थिक मदत

जत वार्ता न्यूज
By -

वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून भिंत कोसळल्याने घडली होती दुर्दैवी घटना


जत/प्रतिनिधी :
     जत तालुक्यातील खलाटी गावात काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत आठ महिन्यांच्या चिमुकल्या बालकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हळहळला आहे. या दुर्घटनेनंतर शिवसेना नेत्या तथा साध्य फाउंडेशनच्या संस्थापिका अँड. सौ. विद्या मोटे यांनी घटनास्थळी भेट देत शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांच्या दुःखात सहभागी होत आर्थिक मदतीचा हात दिला.
     खलाटी गावातील आनंदा बिरू शेजूळ यांच्या घरावर अचानक आलेल्या वादळी वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला होता. या वाऱ्यामुळे घरावरील पत्र्याचे शेड उडून गेले आणि भिंत कोसळून घरातील अवघ्या आठ महिन्यांच्या श्रीवर्धन आनंदा शेजूळ या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेजूळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
     घटनेची माहिती मिळताच अँड. सौ. विद्या मोटे यांनी खलाटी येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी श्रीवर्धनच्या आई-वडिलांचे सांत्वन करत “या कठीण प्रसंगात आम्ही शेजूळ कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वराने त्यांना द्यावे,” अशा भावना व्यक्त केल्या.
     यावेळी साध्य फाउंडेशनच्या वतीने शेजूळ कुटुंबीयांना आर्थिक मदतही करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित कुटुंबांना आधार देण्यासाठी समाजातील सर्व स्तरांतून मदतीचा हात पुढे येण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख महादेव हिंगमिरे इतर पदाधिकारी व शेजुळ कुटुंबीय उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील कच्च्या घरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.