yuva MAharashtra उत्कृष्ट कृषी सेवा पुरस्काराने लिंबाजी सोलंकर यांचा गौरव, जत तालुका सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टराईड असोसिएशनचा उपक्रम; कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

उत्कृष्ट कृषी सेवा पुरस्काराने लिंबाजी सोलंकर यांचा गौरव, जत तालुका सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टराईड असोसिएशनचा उपक्रम; कृषी क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

जत वार्ता न्यूज
By -

जत/प्रतिनिधी :
      जत तालुका सीड्स फर्टीलायझर अँड पेस्टराईड असोसिएशनच्या वतीने येळवी येथील नवज्योत अॅग्रो इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा लिंबाजी सोलंकर यांना कृषी सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल “उत्कृष्ट कृषी सेवा पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
     शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात लिंबाजी सोलंकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धती स्वीकारून उत्पादनवाढ साधल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कन्नुरे होते. यावेळी उपाध्यक्ष अर्जुन सौदे, रोहन चव्हाण, सचिव लक्ष्मण भोईटे, ज्येष्ठ संचालक धानाप्पा ऐनापुरे, परशुराम सांगोलकर, सदाशिव जाधव, सिद्धनाथ रसाळ, बसवराज राचगोंड, राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते.
       संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक, गटप्रमुख आणि शेतकरी यांच्यात समन्वय निर्माण करण्याचे कार्य सातत्याने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती, पारदर्शक व्यवहार तसेच योग्य कृषी सल्ला उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
       विशेष म्हणजे, संस्था स्थापनेला तब्बल २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रथमच सचिव लक्ष्मण भोईटे आणि सिद्धनाथ रसाळ यांच्या पुढाकारातून उत्कृष्ट नियोजनासह पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
     यावेळी कृषी सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्रीशैल माळी, अभिजीत शिंदे, प्रकाश उमराणी, गुरुपुत्रप्पा बसर्गी, पांडुरंग देशमुख, नारायण खोत आणि रामू बिरादार यांनाही कृषी सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
     सभेला जत तालुक्यातील विविध गटप्रमुख, कृषी सेवा केंद्र चालक तसेच कृषी क्षेत्राशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.