yuva MAharashtra जतच्या ग्रामीण विकासाला मोठी चालना, ग्रामीण रस्त्यांसाठी ७५ कोटींची घोषणा; पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

जतच्या ग्रामीण विकासाला मोठी चालना, ग्रामीण रस्त्यांसाठी ७५ कोटींची घोषणा; पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन उत्साहात

जत वार्ता न्यूज
By -

‘देवभूमी जत’ संकल्पनेलाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सकारात्मक प्रतिसाद


जत/प्रतिनिधी
:
     जत तालुक्याच्या ग्रामीण विकासाला मोठी गती देणाऱ्या विविध घोषणांचा वर्षाव पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात झाला. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी जत तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी चालू आर्थिक वर्षात ७५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करताना “आमदार गोपीचंद पडळकर मागणार आणि मी देणार, हा आमचा अलिखित नियमच आहे,” असे सांगत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला.
     जत येथील पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सदाभाऊ खोत होते. यावेळी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, सभापती अर्चना पाटील, उपसभापती रविकुमार बगली, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी १५ कोटी -
     मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, जत तालुक्याला गेल्या अनेक दशकांपासून पंचायत समितीची स्वतंत्र प्रशासकीय इमारत नव्हती. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून १५ कोटी रुपयांच्या या इमारतीचे स्वप्न साकार केले. तालुक्याच्या विकासातील अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी शासनाने घेतली असून गावपातळीवरील विकासकामांना वेग देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
     ते पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी पाच ग्रामपंचायत इमारती मंजूर होत असताना जत तालुक्यासाठी तब्बल २२ ग्रामपंचायत इमारती मंजूर करण्यात आल्या. तसेच तीर्थक्षेत्र पर्यटन विकास योजनेंतर्गत तालुक्यातील नऊ धार्मिक स्थळांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी निधी -
     आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात जत तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था अधोरेखित केली. तालुक्यातील सुमारे ८९० किलोमीटर रस्त्यांचे मजबुतीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मंत्री गोरे यांनी तत्काळ प्रतिसाद देत ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची घोषणा केली. उभारण्यात येणारी पंचायत समितीची इमारत जिल्ह्यातील सर्वात आधुनिक व प्रशासकीयदृष्ट्या सुसज्ज इमारत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

६१ वर्षांनंतर ऐतिहासिक क्षण -
     आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, तब्बल ६१ वर्षांनंतर जत तालुक्यासाठी पंचायत समितीची नवी इमारत साकारत आहे. ना. देवाभाऊ आणि ना. जयाभाऊ यांनी तातडीने निधी मंजूर करून जतच्या विकासाला नवी दिशा दिली, असे ते म्हणाले.
     ते पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांत म्हैसाळ विस्तार योजनेला गती देण्यात आली असून डिसेंबरपर्यंत तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचे नियोजन आहे. जत शहरासाठीची ७९ कोटी रुपयांची पाणी योजना ७० टक्के पूर्ण झाली आहे. तसेच पालिका इमारत, क्रीडा नगरी, प्राणी संग्रहालय, घरकुल योजना आणि कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

गोपीशेठ आधुनिक काळातील मल्हारराव होळकर -
     अध्यक्षीय भाषणात आमदार सदाभाऊ खोत यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या शंभर वर्षांत जितका विकास झाला नाही, तितका विकास अवघ्या दोन वर्षांत झाला आहे. दुष्काळी भागासाठी संघर्ष करणारे हे नेतृत्व आधुनिक काळातील मल्हारराव होळकर आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
     कार्यक्रमात डॉ. रवींद्र आरळी यांनी मनोगत व्यक्त केले, तर प्रास्ताविक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांनी केले.

‘देवभूमी जत’ संकल्पनेला हिरवा कंदील -
     दुष्काळी जत ही ओळख बदलून ‘देवभूमी जत’ अशी नवी ओळख निर्माण करण्याचा संकल्प आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी मांडला. यासाठी अधिकृत दर्जाची मागणी त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली. विशेष म्हणजे मंत्री गोरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच “देवभूमी जत” या शब्दांनी करत या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.