yuva MAharashtra जतच्या भूमिपूजन सोहळ्यात राजकीय जुगलबंदीची रंगत; जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या मिश्किल फटकेबाजीने कार्यक्रमात हास्यकल्लोळ

जतच्या भूमिपूजन सोहळ्यात राजकीय जुगलबंदीची रंगत; जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या मिश्किल फटकेबाजीने कार्यक्रमात हास्यकल्लोळ

जत वार्ता न्यूज
By -

पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात विकासासह मैत्री आणि राजकीय समन्वयाची झलक


जत/प्रतिनिधी :
     जत पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात विकासाच्या घोषणांसोबतच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात रंगलेल्या मिश्किल जुगलबंदीने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. तिन्ही नेत्यांच्या हलक्याफुलक्या शैलीतील संवादामुळे उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ उसळला.
     कार्यक्रमात बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे कौतुक करताना मिश्किल टिप्पणी केली. “महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल तर त्याचे नाव सदाभाऊ खोत आहे. कुणाकडून काय घ्यायचं, कुणाला कुठे दाबायचं आणि कितीही मिळालं तरी ‘माझं काही झालं नाही’ असं कसं म्हणायचं हे शिकायचं असेल तर सदाभाऊंकडून शिकावं,” असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
     ते पुढे म्हणाले, “सदाभाऊंसारखा जीवाभावाचा सहकारी मिळणं हे नशीबाचं काम आहे. देवाभाऊंच्या रूपाने आम्हाला असा सहकारी लाभला आहे,” असे सांगत त्यांनी मैत्रीपूर्ण राजकीय संबंधांची झलक दाखवली.
     यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनीही आपल्या खास शैलीत आमदार गोपीचंद पडळकर यांचे कौतुक केले. “आजच्या युगातील सरसेनापती मल्हारराव होळकर कोण असतील तर ते गोपीचंद पडळकर आहेत,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांची दाद मिळवली. “आम्ही कुठे बटन दाबायचं ते बरोबर दाबतो,” असे म्हणत त्यांनी विकासकामांमागील समन्वयाची मिश्किल शैलीत कबुली दिली.
     पुढे बोलताना त्यांनी गोपीचंद पडळकर यांना उद्देशून, “तुम्ही अजून इतके तरुण आहात की लग्नाच्या वयातही आलेले नाहीत. त्यामुळे चिंता करू नका, तुम्हीही पुढे मोठ्या पदावर जाल. पण तुम्ही दोघं कितीही वर गेलात तरी मला सोबत घेऊन जावं लागेल; नाहीतर मी विमानाला कासरा बांधून तुमच्यासोबत येईल,” असे म्हणताच कार्यक्रमस्थळी एकच हास्यकल्लोळ उडाला.
     आमदार गोपीचंद पडळकर यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. “सदाभाऊंना आम्ही केवळ आमदार म्हणून बोलावलेलं नाही, तर जत तालुक्याची वकिली विनापैशात करणारा मित्र म्हणून बोलावलं आहे,” असे ते म्हणाले. “ते जयाभाऊंचे खास मित्र असून विकासाच्या प्रत्येक विषयावर ते सातत्याने बोलत असतात,” असे सांगत त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावरील आपुलकी व्यक्त केली.
     विकासाच्या कार्यक्रमात रंगलेल्या या राजकीय जुगलबंदीमुळे उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात नेत्यांना प्रतिसाद दिला. गंभीर विकासविषयक घोषणांसोबतच मैत्री, विनोदबुद्धी आणि परस्परांतील समन्वयाची झलक या कार्यक्रमातून पाहायला मिळाली.