yuva MAharashtra विठ्ठलनगर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात | रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; आमदार गोपीचंद पडळकर आणि अॅड. विद्या मोटे एकाच मंचावर

विठ्ठलनगर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात | रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; आमदार गोपीचंद पडळकर आणि अॅड. विद्या मोटे एकाच मंचावर

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी
     जत शहरातील विठ्ठलनगर (रेणुका नगर) येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना नेत्या तथा साध्य फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. विद्या मोटे यांच्या हस्ते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
     यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात २९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना स्व. बाबासाहेब माने यांचे स्मरणार्थ गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
     कार्यक्रमात बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन केले. तसेच विठ्ठलनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी उद्यानाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय जत शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
     अॅड. विद्या मोटे यांनी आपल्या मनोगतात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात एकोपा आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्याची गरज व्यक्त केली. जयंतीच्या निमित्ताने सर्व समाजघटक एकत्र येऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत आहेत, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विठ्ठलनगर परिसरात भविष्यात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या सहकार्याने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    यावेळी विठ्ठलनगर येथील अहिल्यादेवी उद्यानासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांत योगदान देणारे पांडुरंग कटारे सर, तत्कालीन नगराध्यक्ष कै. पट्टू गवंडी, माजी नगरसेवक लक्ष्मण एडके आणि माजी नगरसेविका जयश्री मोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमास मार्केट कमिटीचे माजी सभापती सुजय शिंदे, युवा नेते संग्राम जगताप, स्वच्छता सभापती गौतम ऐवळे, परशुराम मोरे, कुमार साळे, निलेश बामणे, मुन्ना पखाली, हेमंत चौगुले, भीमराव देवकर, संतोष देवकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुराप्पा माने, शिवाजी वाघमोडे, निलेश माने, संजय व्हनमाणे, लखन मदने, पांडुरंग सोलंकर, विजय यमगर, तानाजी कटारे, दादा मदने, सुहास यमगर, संकेत यमगर आणि सुनील बंडगर यांनी विशेष परिश्रम घेतले.

पडळकर–मोटे एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
     विठ्ठलनगर येथील जयंती कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना नेत्या अॅड. विद्या मोटे यांची एकाच मंचावरील उपस्थिती ठरली. जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पडळकर आणि मोटे यांच्यातील मतभेदांची चर्चा सुरू असताना दोन्ही नेते एकत्र दिसल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. या प्रसंगामुळे जत शहरासह तालुक्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, आगामी राजकीय घडामोडींविषयी तर्क-वितर्कांना वेग आला आहे.