yuva MAharashtra जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण | ‘झाडे म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे’; पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायाधीश श्रीमती अदिती कदम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात वृक्षारोपण | ‘झाडे म्हणजे पृथ्वीची फुफ्फुसे’; पर्यावरण संवर्धनाचा संदेश; न्यायाधीश श्रीमती अदिती कदम

जत वार्ता न्यूज
By -
 

सांगली | प्रतिनिधी
     जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली, जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली, वकील संघटना तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा आणि वृक्षसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
     महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला न्यायव्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी आणि विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. जी. ए. कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पर्यावरणाचे मानवी जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करत त्यांनी वृक्षसंवर्धनाची गरज विशद केली.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अदिती कदम होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, “झाडे ही पृथ्वीची फुफ्फुसे आहेत. पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळातील अत्यंत आवश्यक बाब असून प्रत्येक रोपटे म्हणजे भविष्यातील श्वास आहे. पुढील पिढ्यांना शाश्वत भविष्य द्यायचे असेल तर प्रत्येकाने हिरवाईचा वारसा निर्माण करण्यासाठी योगदान दिले पाहिजे,” असे प्रतिपादन केले.
     यावेळी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. वाढते प्रदूषण, ओझोन थराचे नुकसान, वनसंपत्तीतील घट आणि प्लास्टिकच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त करत न्यायाधीश कदम यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, प्लास्टिकचा वापर टाळावा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
     कार्यक्रमास मुख्यालयातील जिल्हा न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. चिंबळकर, कौटुंबिक न्यायाधीश श्रीमती एस. जे. घरत, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयातील अधिकारी तसेच प्रभारी प्रबंधक महेश गुरव आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक श्री. शंकरराव वानखेडे व सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी निसर्गरंग फाउंडेशनचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारी आवश्यक ;
     समाजातील प्रत्येक घटकाने पर्यावरण व निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारल्यास हरित, समृद्ध आणि शाश्वत भविष्य घडविणे शक्य होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनावर भर देण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.