जत | प्रतिनिधी :
जत तालुक्यातील विविध प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवक नेते विक्रम ढोणे यांच्या नेतृत्वाखाली जत येथील प्रशासकीय भवनासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी जत तालुक्याच्या विभाजनाची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच उपजिल्हा रुग्णालय जत व तालुक्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सक्षम करावी, अशी मागणीही करण्यात आली. म्हैसाळ योजनेचे विभागीय कार्यालय जतमध्ये कार्यान्वित करणे, कृषी विभागाकडील प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना वितरित करणे, जत शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करणे, ग्रामीण भागातील पोलिस चौक्या सक्षम करणे तसेच संख अप्पर तहसील कार्यालयात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे या मागण्यांकडेही आंदोलनातून लक्ष वेधण्यात आले.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध प्रश्न तातडीने सोडवावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा विक्रम ढोणे यांनी दिला.
या आंदोलनाला जत वकील संघटना, जत तालुका काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी शरद पवार गट तसेच विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. यावेळी आरपीआयचे संजय कांबळे, वकील संघटनेचे तालुका अध्यक्ष राजकुमार म्हामाणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, माजी सभापती सुजय नाना शिंदे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, भैय्या कुलकर्णी, भुपेंद्र कांबळे, महादेव कोळी, राहुल काळे, अविनाश वाघमारे, राहुल घोडके आदींनी या आंदोलनात सहभागी होत आंदोलनाला पाठिंबा दिला.

