जत | प्रतिनिधी;
पुतळे हे केवळ दगड, धातू किंवा कलाकृती नसून ते समाजाला प्रेरणा देणारी आणि आत्मचिंतनाची संधी उपलब्ध करून देणारी सजीव स्मृतीस्थळे आहेत. पुतळ्यांना पाहिल्यानंतर त्या ठिकाणी काही क्षण थांबून आत्मचिंतन करावे, त्यांच्या विचारांतून ऊर्जा आणि प्रेरणा घेऊनच बाहेर पडावे असे वाटले पाहिजे, असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे जत संस्थानातील शिक्षण क्षेत्राचे उदार आश्रयदाते श्रीमंत रामराव महाराज डफळे, ज्ञानतपस्वी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे आणि युवा प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या अर्धाकृती पुतळ्यांच्या "ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्र" या प्रेरणादायी स्मारकाचे लोकार्पण समारंभ उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अविनाशकाका पाटील होते. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजितराजे डफळे सरकार, संस्थेचे अर्थ सहसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे, माजी प्रशासन सचिव श्री.पी.एस. चव्हाण, आजीव सेवक श्री.कृष्णा बिसले, प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप, डॉ.विठ्ठल ढेकळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकातून पुतळा उभारणीचा संपूर्ण प्रवास उलगडला. पुतळा निधी संकलनापासून ते अनावरण समारंभापर्यंतच्या प्रयत्नांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी आणि माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून दहा लाख रुपयांहून अधिक निधी उभारण्यात आला. सर्वांच्या सहकार्यामुळेच हे प्रेरणादायी "ऊर्जा ज्ञान तीर्थक्षेत्र" साकार होऊ शकले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे पुढे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी गोरगरीब, उपेक्षित, दीनदलित आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्याचप्रमाणे श्रीमंत रामराव महाराज डफळे यांनी जत संस्थानात शिक्षणाच्या प्रसारासाठी उदार आश्रय देत शैक्षणिक चळवळीला भक्कम पाठबळ दिले. या महान विभूतींच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा, ऊर्जा आणि जीवनमूल्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यांची उभारणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी आत्ममग्न होऊन उच्च ध्येय बाळगावे, कठोर परिश्रम आणि संस्कारांच्या बळावर जीवनात यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून संस्कारांचे केंद्र आहे. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या समाजनिष्ठ विचारांमधून आणि शिक्षणावरील निष्ठेतूनच या संस्थेची उभारणी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा.जयसिंगराव सावंत, मा.अर्जुन सवदे, मा.शिवकिरण बामणे, डॉ.शुद्धमती फुलसागर, डॉ.शिवाजीराव बिसले आणि प्राचार्य डॉ.अशोकराव जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील कार्यकाळातील विविध आठवणींना उजाळा करुन दिला. त्यांनी या प्रेरणास्थळामुळे भावी पिढीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या समारंभास प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर, उमदी येथील सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव एस. के. होर्तीकर, आजीव सेवक कृष्णा बिसले, अशोक पवार, प्रकाश हाके, डॉ.परमानंद भोसले, प्रा.श्रीमंत ठोंबरे, प्रा.चंद्रसेन मानेपाटील, प्रा.सिद्राम चव्हाण, उपप्राचार्य प्रा.कृष्णा रानगर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मा.चंद्रशेखर गोब्बी, मा.प्रभाकर जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, माजी विद्यार्थी, हितचिंतक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सतीशकुमार पडोळकर आणि डॉ.रामदास बनसोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी मानले.

