जत | प्रतिनिधी :
राज्यासह जत तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या चिंता दूर व्हाव्यात आणि निसर्गाची कृपा व्हावी या उद्देशाने चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या पुढाकाराने जत तालुक्यातील गुड्डापूर येथील महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष धार्मिक उपक्रम पार पडला.
“एक पाऊल पावसासाठी, देवाच्या चरणी” या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात देवीच्या आरतीवेळी पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर हभप तुकाराम बाबा महाराज यांनी मंदिर परिसरात आणि देवीच्या मुख्य मंदिराभोवती लोटांगण घालत वरुणराजाला साकडे घातले. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन सर्वत्र चांगला पाऊस पडावा, शेतीला जीवनदान मिळावे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
प्रार्थना आणि आरतीनंतर उपस्थित भाविकांनी देवीचे दर्शन घेत पावसासाठी सामूहिक प्रार्थना केली. राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या पाणीटंचाई व पावसाअभावी निर्माण झालेल्या संकटावर मात व्हावी, या भावनेतून हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी हभप तुकाराम बाबा महाराज यांनी धार्मिक श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत १००१ वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ केला. वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेता वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. धार्मिक श्रद्धेबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या उपक्रमात विविध सामाजिक कार्यकर्ते, भाविक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रद्धा, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी प्रसिद्ध वास्तूविशारद तज्ज्ञ सरिताताई लिंगायत, धनाप्पा पुजारी, संतोष पुजारी, अशोक पुजारी, देवस्थान एमडी, तसेच जयदीप माने, पिंटू मोरे, सावली राठोड, बसू बागाळे, मनोहर हुवाळे, मंजुनाथ पुजारी, ईराना जेऊर, होस्पेट, श्रीकृष्ण बुरुंगले, दयानंद गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
पावसासाठी केलेली सामूहिक प्रार्थना आणि त्यासोबतच राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानामुळे हा उपक्रम भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. श्रद्धा, निसर्गप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडविणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

