जत | प्रतिनिधी ;
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनर्निरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर जत विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या बीएलए-२ कार्यकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. मतदार यादी पुनर्निरीक्षण प्रक्रियेत एकही पात्र मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी बूथस्तरावरील कार्यकर्त्यांनी सतर्क राहून काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंतराव पवार आणि दहर मुजावर यांनी मार्गदर्शन केले. राज्यात सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेदरम्यान स्थलांतर, अनुपस्थिती किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता असल्याने मतदार यादीची बारकाईने पडताळणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत लोकशाही अधिकार असून कोणत्याही परिस्थितीत पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाऊ नये, यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते घराघरांत जाऊन मतदार पडताळणी करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्याक, मागासवर्गीय, आदिवासी, शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांचे मतदानाचे अधिकार अबाधित राहावेत, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
शिबिरामध्ये मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, स्थलांतरित मतदारांची नोंद, दावे व हरकती दाखल करण्याची प्रक्रिया तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्येक बूथमधील कुटुंबांशी संपर्क साधून मतदार यादीतील नावे तपासण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या.
जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत यांनी मतदार यादी ही लोकशाहीचा पाया असल्याचे सांगत प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव यादीत कायम राहण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे काम करतील, असे सांगितले. बूथनिहाय नियोजन, मतदारांशी संपर्क आणि जनजागृती मोहिमेवर भर देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस नंदकुमार शेळके, तालुकाध्यक्ष महादेव पाटील, बाबासाहेब कोडग, सुजय नाना शिंदे, प्रमोद सावंत, लक्ष्मण चव्हाण, निंगाप्पा कोरे, मल्लेश कत्ती, जिल्हा बँकेचे संचालक राम सरगर, मारुती पवार, भूपेंद्र कांबळे, आण्णाराव पाटील, साहेबराव शिंदे यांच्यासह काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी काळात जत विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बूथवर सक्रियपणे काम करून मतदारांच्या अडचणी सोडविणे, मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा निर्धार शिबिरात व्यक्त करण्यात आला.

