yuva MAharashtra ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत : बसवराज पाटील

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी : 
     राज्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेत वीज ग्राहकांची पूर्वसंमती घेणे बंधनकारक करावे आणि कोणत्याही ग्राहकावर त्याच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर लादू नयेत, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांनी केली आहे. तसेच स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तालुकाभर विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
     बसवराज पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, अशी भावना अनेक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन आणि वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांच्या मनातील शंका दूर करून पारदर्शकपणे माहिती द्यावी. ग्राहकांची स्पष्ट संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची घाई करू नये, अशी मागणी त्यांनी केली.
     स्मार्ट मीटरविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने गावोगावी बैठका, पत्रकांचे वितरण तसेच नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी, सूचना आणि समस्या संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कामही पक्षाकडून करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
     जनतेच्या हिताला बाधा पोहोचेल असे कोणतेही निर्णय स्वीकारले जाणार नाहीत. नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्यास जनसुराज्य शक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल, असा इशाराही बसवराज पाटील यांनी दिला.