सामाजिक उपक्रमावरून मतभेद; ‘चांगल्या कामाला विरोध झाला तरी समाजसेवा सुरूच ठेवणार’ – परशुराम मोरे
जत | प्रतिनिधी :
जत शहरातून जाणाऱ्या विजापूर–गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकासाठी सोडण्यात आलेली चर बुजविण्याच्या कामावरून भाजपचे जत शहर मंडळाध्यक्ष अण्णा भिसे आणि नगरसेवक परशुराम मोरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. सामाजिक कार्याच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या कामाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद उघडपणे समोर आल्याने राजकीय वर्तुळातही याची चर्चा सुरू आहे.
नगरसेवक परशुराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जागर फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून शहर व परिसरात सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता तसेच जनहिताचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाहनधारक आणि नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या मागणीची दखल घेत संस्थेच्या वतीने काही दिवसांपूर्वी विजापूर–गुहागर महामार्गावरील दुभाजकासाठी ठेवण्यात आलेली चर बुजविण्याचे काम करण्यात आले.
या कामामुळे वाहनधारकांना होणारा त्रास कमी होईल आणि वाहतुकीची सुविधा सुधारेल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मोरे समर्थकांचे म्हणणे आहे. मात्र या कामाबाबत भाजपचे शहर मंडळाध्यक्ष अण्णा भिसे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे.
माहितीनुसार, अण्णा भिसे यांनी नगरसेवक परशुराम मोरे यांना अशा प्रकारची कामे स्वतःहून न करता संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून करावीत, असे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही काम करताना प्रशासनाची परवानगी व नियमानुसार प्रक्रिया आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावर उत्तर देताना नगरसेवक परशुराम मोरे यांनी समाजसेवा ही आपली भूमिका असून जनतेच्या हितासाठी आवश्यक वाटणारी कामे करण्यासाठी आपण कोणाची वाट पाहत नसल्याचे ठामपणे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास कमी करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
चांगल्या कामाला विरोध झाला तरी थांबणार नाही -याबाबत प्रतिक्रिया देताना नगरसेवक परशुराम मोरे म्हणाले, समाजहितासाठी सुरू केलेल्या उपक्रमांना कोणाचा कितीही विरोध झाला तरी आम्ही मागे हटणार नाही. नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि जनतेच्या हिताची कामे करण्यासाठी जागर फाउंडेशनचे कार्य यापुढेही सुरूच राहील.
या घटनेमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून जनहिताच्या कामांबाबत समन्वय आणि प्रशासनाची भूमिका यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

