जत | प्रतिनिधी :
जत शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि महाविद्यालयांच्या परिसरात रोडरोमिओ तसेच नशेच्या आहारी गेलेल्या युवकांचा वाढता वावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन जत पोलिस ठाण्यास देण्यात आले आहे. या निवेदनावर माजी सभापती सुजय नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, निलाबाई कोळी, सुप्रिया बामणे, शबाना जमखंडी, भैया कुलकर्णी, अनुसया माने, काजल काळे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे, निलेश बामणे, गणेश गिड्डे आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात काही युवकांकडून विद्यार्थिनींचा पाठलाग करणे, अश्लील हावभाव करणे, विनाकारण गर्दी करणे, दुचाकीवर भरधाव फिरणे, मोठ्या आवाजात हॉर्न वाजविणे तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, गुटखा व अन्य अमली पदार्थांचे सेवन करणे अशा प्रकारांना ऊत आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून त्यांच्या शिक्षणावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. पालक आणि नागरिकांकडूनही याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व महाविद्यालये सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत पोलिस गस्त वाढविणे, प्रमुख शैक्षणिक संस्थांजवळ अँटी-रोमिओ पथक नियुक्त करणे, रोडरोमिओ व नशेखोर युवकांवर कठोर कारवाई करणे, अमली पदार्थांच्या विक्री व सेवनाविरोधात विशेष मोहीम राबविणे आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचीही सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, पालकांचा विश्वास आणि शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

