जत | प्रतिनिधी :
जत येथील सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी कु. आयुष टोने याने देशातील अत्यंत प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या जेईई अॅडव्हान्स (JEE Advanced) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेसाठी प्रवेश निश्चित केला आहे. त्याच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण जत तालुक्याचा गौरव वाढला आहे.
आयुष टोने हा सिद्धार्थ पब्लिक स्कूलचा बालवाडीपासून दहावीपर्यंतचा विद्यार्थी असून शालेय जीवनात त्याने सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. आयआयटीसारख्या देशातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवून त्याने आपल्या मेहनतीचे चीज केले आहे.
देशभरातील लाखो विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्याचे स्वप्न पाहतात. कठोर परिश्रम, समर्पण आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या बळावर आयुषने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे. त्याचे हे यश सिद्धार्थ पब्लिक स्कूलमधील विद्यमान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयुष तसेच त्याचे पालक यांचे अभिनंदन केले. त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी शाळेचे संचालक डॉ. कैलास सनमाडीकर आणि डॉ. वैषाली सनमाडीकर यांनी, “आयुषचे हे यश शाळेसाठी अभिमानाची बाब असून त्याने सिद्धार्थ पब्लिक स्कूलचे नाव उज्ज्वल केले आहे. भविष्यातही तो यशाची नवी शिखरे सर करेल, असा आम्हाला विश्वास आहे,” असे सांगितले.

