yuva MAharashtra जागर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; महामार्गावरील धोकादायक चर बुजवून अपघातांना आळा

जागर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; महामार्गावरील धोकादायक चर बुजवून अपघातांना आळा

जत वार्ता न्यूज
By -

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीचे दर्शन; नागरिकांकडून उपक्रमाचे स्वागत

जत | प्रतिनिधी ;
     जत शहरातील मुख्य बसस्थानक ते गुरू बसवेश्वर महाराज चौक या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील अपघाताला निमंत्रण देणारी धोकादायक दुभाजक चर (खड्डा) जागर फाउंडेशनच्या वतीने काँक्रिटीकरण करून बुजविण्यात आली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे वाहतूक सुरक्षिततेला हातभार लागला असून नागरिकांमधून या सामाजिक कार्याचे स्वागत होत आहे.
     शहरातील विजयपूर-गुहागर या महामार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. दुभाजकाजवळील खोल चर पावसाळ्यात अधिक धोकादायक बनत होती. यामुळे अनेक वेळा अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त होत असताना जागर फाउंडेशनने पुढाकार घेत हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला.
     जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परशुराम  मोरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी श्रमदान करत काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून चर बुजविण्याचे काम पूर्ण केले. कोणत्याही राजकीय स्वार्थापेक्षा नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची मानत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
एकतेच्या बळावर यशस्वी मोहीम ;
     या उपक्रमात नगरसेवक राजकुमार साळे, प्रमोद हिरवे, राजू यादव, समाजसेवक सिद्धू जाधव, अतुल मोरे, गोपाल पाथरूट, फाउंडेशनचे उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांच्यासह सुदीप राजभोज, अभिनंदन साबळे, आनंद कांबळे, अजय साबळे, समर्थ चव्हाण, बंटी कटकटी आणि जागर फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
     यावेळी बोलताना परशुराम मोरे यांनी, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे काम हाती घेतले. अनेक सहकाऱ्यांच्या पाठबळामुळे हे काम यशस्वीपणे पूर्ण झाले, असे सांगितले.
टीकेला उत्तर; सामाजिक कार्य सुरूच राहणार
     काम सुरू असताना काही ठिकाणी किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता असलेल्या भागांचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करून उपक्रमावर टीका करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना परशुराम मोरे यांनी काही लोक चांगल्या कामातही उणिवा शोधण्याचा प्रयत्न करतात, असे नमूद केले.
     जत शहरातील सुज्ञ नागरिक आमच्या पाठीशी आहेत. समाजहिताच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांकडे आम्ही लक्ष देत नाही. जिथे नागरिकांच्या समस्या असतील, तिथे जागर फाउंडेशन पोहोचणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नागरिकांकडून कौतुक ;
     वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावरील धोकादायक चर बुजविल्याने वाहनचालक आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अपघातांची शक्यता कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे जागर फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
जिथे कमी, तिथे जागर फाउंडेशन ;
     जत शहर व तालुक्यातील नागरी समस्यांवर सामाजिक सहभागातून उपाय शोधण्याचा जागर फाउंडेशनचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मूलभूत सुविधांसाठी प्रशासनासोबत समन्वय साधत आवश्यक ठिकाणी पुढाकार घेण्याचा निर्धार संस्थापक अध्यक्ष परशुराम मोरे यांनी व्यक्त केला.