yuva MAharashtra बहुजन महापुरुषांच्या विचारांचा जागर; जतमध्ये एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

बहुजन महापुरुषांच्या विचारांचा जागर; जतमध्ये एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

जत वार्ता न्यूज
By -

फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन; डी. आर. ओहोळ यांचे सखोल मार्गदर्शन


जत | प्रतिनिधी ;

     सम्राट अशोक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती तसेच माता रमाबाई आंबेडकर आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयात एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. बहुजन महापुरुषांच्या विचारधारेचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या शिबिरास बहुजन समाजातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
     या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. ओहोळ उपस्थित होते. त्यांनी तब्बल सहा ते सात तास विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. महापुरुषांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यागाची आठवण करून देताना त्यांनी इतिहासाचे महत्त्व अधोरेखित केले.
     यावेळी बोलताना ओहोळ म्हणाले, "ज्या महापुरुषांनी आपल्या उद्धारासाठी संघर्ष केला, त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहासापासून धडा घेतला नाही, तर इतिहासच आपल्याला धडा शिकवतो. फुले, शाहू, आंबेडकर आणि इतर बहुजन महापुरुषांचे कार्य व विचार समाजापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वीकारली पाहिजे."
     त्यांनी पुढे सांगितले की, सर्व महापुरुषांचे अंतिम ध्येय सामाजिक समता, शिक्षण आणि मानवमुक्ती हेच होते. त्यांच्या विचारांचा वारसा जपत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे. बदलत्या काळातील सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षणाचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ सरिता पटणशेट्टी यांनी आपल्या मनोगतात महापुरुषांचे विचार, महात्मा बसवेश्वर यांची शिकवण आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने आदर्श जीवनमूल्ये आत्मसात करण्याची गरज यावर प्रकाश टाकला.
     या शिबिराचे आयोजन सम्राट अशोक सेवाभावी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अतुल कांबळे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जकाप्पा सर्जे, रवींद्र सोलंकर, तानाजी व्हनखंडे, सुनील केतन, शरद साळे, बाळू कणसे, शरद शिवशरण, सुनील सूर्यवंशी तसेच बहुजन समाज पार्टीच्या जत तालुक्यातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमातून बहुजन महापुरुषांच्या विचारांचा जागर करत सामाजिक परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांनी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महापुरुषांचा इतिहास जाणून घ्या, विचार आत्मसात करा;
     बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. आर. ओहोळ यांनी प्रशिक्षण शिबिरात कार्यकर्त्यांना इतिहास, शिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि संघटनात्मक बांधणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत समाजात प्रबोधनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.