yuva MAharashtra विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये महायुतीची बैठक | प्रचार नियोजन, मतदार संपर्क आणि संघटनात्मक समन्वयावर चर्चा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये महायुतीची बैठक | प्रचार नियोजन, मतदार संपर्क आणि संघटनात्मक समन्वयावर चर्चा

जत वार्ता न्यूज
By -
जत | प्रतिनिधी ;
     सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जत येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची, लोकप्रतिनिधींची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. बैठकीत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचे नियोजन, मतदारांशी संपर्क आणि संघटनात्मक समन्वय यावर चर्चा करण्यात आली.
     बैठकीस राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार मनोज घोरपडे, माजी मंत्री सदाभाऊ खोत, राज्य मंत्री मदन देशपांडे, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी, पंचायत समिती सभापती अर्चना पाटील यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.
     यावेळी उपस्थित नेत्यांनी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, प्रचार मोहिमेचे नियोजन, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी संपर्क तसेच निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध बाबींवर मार्गदर्शन केले. मतदारांशी सातत्यपूर्ण संवाद राखणे आणि निवडणुकीसाठी आवश्यक समन्वय वाढविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
     बैठकीत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामे व योजनांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांशी संपर्क वाढवून निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
     या बैठकीस स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांकडून प्रचार व नियोजन बैठका आयोजित केल्या जात आहेत.