जत परिसरात विविध गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेला आणि शस्त्र बाळगल्याच्या गुन्ह्यात गेल्या काही काळापासून फरार असलेला मधुकर ऊर्फ मध्या दादासो वाघमोडे (वय ४०, रा. गुळवंची, ता. जत) याला जत पोलिसांनी रविवारी अटक केली. गुळवंची येथे क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये धावडवाडी-गुळवंची मार्गावरील वाघमोडे वस्तीजवळ वाहन तपासणीदरम्यान पोलिसांना पाहून वाघमोडे पसार झाला होता. त्यावेळी त्याच्या चारचाकी वाहनातून तलवार आणि लोखंडी हत्यार जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मधुकर वाघमोडे याच्यावर खंडणी, अपहरण, मालमत्तेविरोधातील गुन्हे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो यापूर्वी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या प्रकरणातही आरोपी राहिलेला असून संबंधित गुन्ह्यात फरार होता.
दरम्यान, फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे यांना वाघमोडे गुळवंची येथे क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीवर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या महाराष्ट्रात प्रवेशबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचेही समोर आले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरप्पा लातुरे, पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, पोकॉ गणेश ओलेकर, योगेश पाटोळे, कोंडीबा बंडगर तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जत पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे करीत आहेत.

