ग्रामीण रस्ते, पाणंद मार्ग आणि शेतमार्गांचे सीमांकन सुरू; तहसीलदार कार्यालयाचे आवाहन
ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे ग्रामीण मार्ग, पाणंद रस्ते, गाडीमार्ग तसेच शेतांमध्ये जाणाऱ्या पायवाटा आणि गाडीमार्गांचे सीमांकन करून त्यांना स्वतंत्र क्रमांक देण्याची प्रक्रिया जत तालुक्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदार प्रवीण धनोरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या विविध शासन निर्णयांनुसार ग्रामीण भागातील रस्ते व मार्गांची नोंद गाव दप्तरी करण्याचे काम सुरू आहे. जत तालुक्यातील ९२ गावांमध्ये या संदर्भातील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, अनेक ठिकाणी गाव नकाशावरील रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून काही ठिकाणी मूळ हद्दीच नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवर विविध प्रकारचे अडथळे निर्माण केल्याने शेतकऱ्यांच्या ये-जा, मशागत आणि शेतमाल वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्रशासनाकडे दाखल होत असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तहसील प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नकाशावरील ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते, गाडीमार्ग आणि शेतमार्गांवर अतिक्रमण करून अडथळे निर्माण केल्यास संबंधित शेतकरी किंवा खातेदारांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
याशिवाय संबंधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांना मिळणारे विविध शासकीय लाभही बंद करण्यात येऊ शकतात. यामध्ये रेशनवरील धान्य, संजय गांधी, श्रावणबाळ यांसारख्या पेन्शन योजनांचे लाभ तसेच कृषी योजनांसाठी आवश्यक असलेली फार्मर आयडी रद्द करून पीएम-किसान योजनेचा लाभही थांबविण्याची कार्यवाही केली जाऊ शकते, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तालुक्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी रस्ते व मार्ग मोकळे ठेवून सीमांकन प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रवीण धनोरकर यांनी केले आहे.

