yuva MAharashtra बनावट नंबरप्लेट लावून शासनाची फसवणूक; मिरजेत दोघांवर गुन्हा, १० लाखांचा टेम्पो जप्त

बनावट नंबरप्लेट लावून शासनाची फसवणूक; मिरजेत दोघांवर गुन्हा, १० लाखांचा टेम्पो जप्त

जत वार्ता न्यूज
By -


मिरज | प्रतिनिधी :
     बनावट नंबरप्लेटचा वापर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई करत सुमारे १० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो जप्त केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
     पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २० जून रोजी भारतनगर, १०० फूट रस्ता परिसरात संशयित टेम्पोची तपासणी करण्यात आली. वाहनचालकाकडे कागदपत्रांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर ई-चलन प्रणालीद्वारे वाहनाची पडताळणी केली असता इंजिन व चेसिस क्रमांकामध्ये तफावत आढळून आली. अधिक चौकशीत संबंधित वाहनावर दुसऱ्या वाहनाची बनावट नंबरप्लेट लावून त्याचा वापर करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.
     तपासात वाहनाचे विमा, पीयूसी, फिटनेस प्रमाणपत्र तसेच रोड टॅक्सची देयके टाळण्यासाठी बनावट नंबरप्लेटचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचे उघड झाले. याप्रकरणी वाहन मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहन जप्त करण्यात आले आहे.
     ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे पोलीस, उपनिरीक्षक पूनम पाटील, पो. हे. सचिन कुंभार, राहूल क्षीरसागर, सर्जेराव पवार, पो. ना. नानासाहेब चंदनशिवे, पो. कॉ. अमोल तोडकर, सुनिल माने, देवानंद नागरगोजे, हणमंत कोळेकर यांनी केली.
     दरम्यान, बनावट नंबरप्लेट किंवा अशा प्रकारच्या फसवणुकीची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ डायल ११२ किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अशा गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.