yuva MAharashtra राजर्षी शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने प्रज्ञा काटे यांचा गौरव | शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्याची राज्यस्तरावर दखल

राजर्षी शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्काराने प्रज्ञा काटे यांचा गौरव | शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्याची राज्यस्तरावर दखल

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जत येथील कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे यांना 'राजर्षी शाहू राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार – २०२६' या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     कोल्हापूर येथील राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रज्ञा काटे यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, विविध साहित्यिक, विचारवंतांचे प्रेरणादायी पुस्तकांचा संच आणि गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक क्षेत्रातील सक्रिय सहभाग, विविध सामाजिक उपक्रमांमधील योगदान तसेच प्रबोधनात्मक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
     अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना दिपकभाई केदार, लेखक व इतिहास संशोधक डॉ. कपिल राजहंस, आंबेडकरवादी नेते मा. उत्तमदादा कांबळे, लेखक व शिक्षक नेते मा. भरत रस्ताळे, लेखक व विचारवंत मा. मदन पवार, प्रकाशक व चित्रकार मा. अनिल म्हमाणे, लेखक व इतिहास संशोधक डॉ. वसंत भागवत, प्राध्यापिका व लेखिका डॉ. शशिमा चाळके, अध्यक्ष, विद्या चौकट ट्रस्ट मा. विश्वास तरटे तसेच अखिल भारतीय महिला मंचच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     सध्या प्रज्ञा काटे या बी.ए.एम.एस.च्या द्वितीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत असून, शिक्षणासोबतच सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यातही त्या सक्रिय आहेत. शालेय जीवनापासूनच त्यांनी वक्तृत्व स्पर्धा, सामाजिक जनजागृती अभियान, शैक्षणिक उपक्रम तसेच विविध प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदविला आहे. युवकांमध्ये सामाजिक भान, शिक्षणाचे महत्त्व आणि सकारात्मक विचार रुजविण्यासाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत.
     प्रज्ञा काटे यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन, नांदेड यांच्या वतीने त्यांना 'राज्यस्तरीय आदर्श बालगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
     प्रज्ञा काटे या सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते व स्टॅम्प व्हेंडर बाबासाहेब काटे (जाडरबोबलाद) यांच्या कन्या आहेत. शिक्षणासोबत समाजसेवेची जपलेली बांधिलकी आणि सातत्यपूर्ण प्रबोधनात्मक कार्यामुळे त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने जत तालुका व सांगली जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.