तलावाची पाणीसाठवण क्षमता घटली; पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे सिंचनावर परिणाम
जत | प्रतिनिधी
शेगाव परिसरातील शेकडो शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या शेगाव साठवण तलाव क्र. २ मध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा, दगडगोटे आणि झुडपे साचल्याने तलावाची पाणीसाठवण क्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील संपूर्ण कचरा काढून तलाव स्वच्छ करावा, अशी मागणी शेगाव सर्वसेवा सोसायटीचे माजी चेअरमन व प्रगतशील शेतकरी विजयकुमार बोराडे यांनी केली आहे.
बोराडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सुमारे ५०० एकरांहून अधिक क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणारा हा तलाव पूर्णत्वास येऊन अनेक वर्षे लोटली आहेत. मात्र तलावाच्या बांधकामावेळी संबंधित ठेकेदाराने खोदकामातून निघालेला मोठ्या प्रमाणातील दगड, माती व अन्य कचरा तलावाबाहेर न टाकता तलावाच्या परिसरातच टाकल्याचा परिणाम आजही दिसून येत आहे.
त्यामुळे तलावाच्या जवळपास ४० टक्के भागात मोठमोठे दगड, दगडगोटे, झाडे, काटेरी झुडपे आणि इतर कचरा साचलेला असून केवळ ६० टक्के भागातच पाणी साठवले जात आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सोडले अथवा पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला तरी तलाव पूर्ण क्षमतेने भरत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
शेगाव व परिसरातील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून तलावातील कचरा काढून पाणीसाठवण क्षमता वाढविण्याची मागणी करत आहेत. मात्र प्रशासन आणि पाटबंधारे विभागाकडून या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बोराडे म्हणाले, जर तलावातील कचरा यापूर्वीच काढण्यात आला असता तर तलावात शंभर टक्के पाणी साठले असते. त्यामुळे पाणीसाठा वाढून हजारो एकर क्षेत्राला अतिरिक्त सिंचनाचा लाभ मिळाला असता. सध्या या तलावावर शेकडो विद्युत मोटारी बसवून शेतकरी शेतीसाठी पाणी उपसा करत आहेत. त्यामुळे तलावातील प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी यांत्रिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने तलावातील कचरा, दगड व झुडपे हटवून तलावाची क्षमता पूर्ववत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तलाव स्वच्छ झाल्यास सिंचनक्षेत्रात मोठी वाढ;शेगाव साठवण तलाव क्र. २ मधील कचरा हटविल्यास तलावाची पाणीसाठवण क्षमता लक्षणीय वाढणार आहे. परिणामी अधिक क्षेत्र सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याची उपलब्धता होऊ शकते. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने कारवाई करून तलावातील अडथळे दूर करावेत, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

