जत | प्रतिनिधी :
जत तालुक्यातील गॅस एजन्सींचे वर्गीकरण अद्यापही 'ग्रामीण' क्षेत्र म्हणून होत असल्याने नागरिकांना गॅस सिलिंडर बुकिंगसाठी ४५ दिवसांच्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येकडे सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुजय (नाना) शिंदे यांनी खासदार विशाल पाटील यांचे लक्ष वेधत सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली (पुरवठा शाखा) यांनी संबंधित तेल कंपन्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.
२२ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, जत नगरपरिषद क्षेत्रासह जिल्ह्यातील इतर पात्र शहरांमधील गॅस एजन्सींच्या विद्यमान वर्गीकरणाची पडताळणी करून त्यांना 'शहरी क्षेत्र (Urban Area)' म्हणून अद्ययावत करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
सध्या ग्रामीण वर्गीकरणामुळे ग्राहकांना २५ दिवसांऐवजी तब्बल ४५ दिवसांच्या बुकिंग कालावधीचा सामना करावा लागत आहे. वर्गीकरणात बदल झाल्यानंतर नागरिकांना शहराप्रमाणे जलद गॅस सिलिंडर वितरणाचा लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्यामुळे कार्यवाही सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, लवकरच जत शहरातील ग्राहकांना शहरी सुविधांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

