जत | प्रतिनिधी:
मोटेवाडी (ता. जत) येथील मरगुबाई मंदिर परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या सहा जणांच्या कुटुंबीयांना भारती विद्यापीठाच्या वतीने प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचे धनादेश सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले.
या दुर्घटनेनंतर माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी भारती विद्यापीठाच्या वतीने प्रत्येक मृताच्या वारसांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार मोटेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात मृतांच्या वारसांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
याप्रसंगी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महादेव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी, बिराप्पा शिंदे, भिमगोंडा पाटील, मोटेवाडीचे तलाठी, पोलीस पाटील, सरपंच, नागेश मोटे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले की, दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही कायम ठामपणे उभे आहोत. राज्यात कुठेही अशा प्रकारची आपत्ती उद्भवल्यास कदम कुटुंब आणि भारती विद्यापीठ सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे करत असते. तसेच अडचणीत असलेल्या रुग्णांनाही भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य केले जाते.
भविष्यातही या दुर्घटनेतील बाधित कुटुंबीयांना आवश्यक ते सहकार्य करण्यासह गरजू नागरिकांना न्याय व मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आमदार डॉ. विश्वजित कदम आणि भारती विद्यापीठाने केलेल्या आर्थिक मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

