टोल प्रशासनाशी चर्चेनंतर सकारात्मक निर्णय; आषाढी वारीतील वारकऱ्यांना दिलासा
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सासवड–जेजुरी मार्गावरील बेलसर टोल प्लाझा येथे काही वारकऱ्यांच्या वाहनांकडून टोल शुल्क आकारले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाने तत्काळ पुढाकार घेत वारकऱ्यांच्या सेवेसाठी हस्तक्षेप केला. टोल प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वारकऱ्यांच्या वाहनांना विनाटोल मार्ग उपलब्ध करून देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सागर शिनगारे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनीष कोंडे तसेच उद्योग विभागाचे सचिन देशमुख यांनी बेलसर टोल प्लाझा प्रशासनाशी चर्चा केली. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही आर्थिक किंवा प्रशासकीय अडथळा निर्माण होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
या चर्चेनंतर टोल प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत वारकऱ्यांच्या वाहनांना विनाटोल मार्ग देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त करत संबंधितांचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धा, संस्कृती, भक्ती आणि सेवाभावाची गौरवशाली परंपरा आहे. लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करतात. अशा पवित्र वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.
"ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात वारकऱ्यांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची भावना व्यक्त करत, भविष्यातही वारकऱ्यांच्या सेवेसाठी अशाच प्रकारे कार्यरत राहणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

