जत | प्रतिनिधी :
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जत दौऱ्यादरम्यान जत पोलीस ठाण्यात तालुक्यातील माजी सैनिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध अडचणी व तक्रारी जाणून घेतल्या. माजी सैनिकांच्या तक्रारींना प्राधान्य देत त्यांचे तातडीने निवारण करण्यासाठी स्वतंत्र फाईल तयार करून पाठपुरावा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी माजी सैनिकांनी जमीन, महसूल, कायदा व सुव्यवस्था तसेच अन्य प्रशासकीय प्रश्नांबाबत येणाऱ्या अडचणी पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्या. त्यावर तुषार दोशी यांनी माजी सैनिकांच्या तक्रारी गांभीर्याने हाताळून त्यांचे शक्य तितक्या लवकर निवारण करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत जत तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने दर महिन्याला जत पोलीस ठाण्यात माजी सैनिकांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी नियमित मासिक बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीमुळे माजी सैनिकांच्या प्रश्नांचे वेळेत निराकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
संवादानंतर जत तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन जत पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमास संघटनेचे उपाध्यक्ष हवालदार महेशकुमार जगताप, कॅप्टन विजय कुरणे, दत्तात्रय शिंदे, कॅप्टन उमाजी महारनूर, सुभेदार मेजर सतीश शिंदे, सुभेदार आकाराम बिसले, मार्गदर्शक सुभेदार स्वामी साहेब, हवालदार सचिन पाटील, हवालदार तानाजी गायकवाड यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने माजी सैनिक उपस्थित होते.
माजी सैनिकांच्या प्रश्नांना प्राधान्य;माजी सैनिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र नोंदवही व फाईल तयार करून प्रत्येक प्रकरणाचा नियमित पाठपुरावा करावा, तसेच तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी यावेळी दिल्या.

