yuva MAharashtra सिद्धार्थ पॉलिटेक्निकमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत | प्रवेश स्वागत कार्यक्रमात शिस्त, कौशल्य आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचा दिला मंत्र

सिद्धार्थ पॉलिटेक्निकमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत | प्रवेश स्वागत कार्यक्रमात शिस्त, कौशल्य आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचा दिला मंत्र

जत वार्ता न्यूज
By -
 
जत | प्रतिनिधी : 
     सिद्धार्थ पॉलिटेक्निक, जत येथे प्रथम वर्ष तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश स्वागत (इंडक्शन) कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख करून देतानाच तांत्रिक शिक्षणातील संधी, करिअरच्या दिशा आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. रेणुका वाघोली या होत्या, तर फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, सांगोला येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागप्रमुख दत्तात्रय बी. नरळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
     प्राचार्या सौ. रेणुका वाघोली यांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत महाविद्यालयाची शैक्षणिक परंपरा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, गुणवत्तापूर्ण अध्यापन, औद्योगिक प्रशिक्षण तसेच प्लेसमेंटच्या उपलब्ध संधींची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सर्वांगीण विकासावर भर देऊन महाविद्यालयीन जीवनातील प्रत्येक संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
     प्रमुख पाहुणे दत्तात्रय बी. नरळे यांनी अभियंता म्हणून यशस्वी होण्यासाठी शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास, तांत्रिक कौशल्य, वेळेचे योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन या गुणांचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेच्या युगात केवळ पदवी नव्हे, तर कौशल्यसंपन्न अभियंता बनण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.
     या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा अभियांत्रिकीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरणाशी परिचित करून देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरला.
     कार्यक्रमासाठी संस्थेच्या चेअरपर्सन डॉ. वैशाली सनमडीकर, व्हाइस चेअरमन विशाल जाधव, चेअरमन भारत साबळे आणि सचिव डॉ. कैलास सनमडीकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.