गणेशोत्सवातील मंडळांवर कारवाई केली तर उपोषण!
जत | प्रतिनिधी ;
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमबाह्य पद्धतीने डीजे, ध्वनिक्षेपक व अन्य ध्वनिवर्धक साधनांचा वापर करणाऱ्या तसेच सार्वजनिक रस्त्यांवर मंडप, कमानी, सजावट, खुर्च्या आदी साहित्य उभारून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हेमंत चौगुले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्याकडे निवेदन दिले आहे.
मात्र, चौगुले यांच्या मागणीला नगरसेवक परशुराम मोरे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गणेशोत्सव आणि विविध सण-उत्सवांची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असून, उत्सवाच्या काळात गणेश मंडळांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात उपोषण करण्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे. त्यामुळे जत शहरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमपालन विरुद्ध उत्सवपरंपरा असा नवा वाद निर्माण झाला आहे.
नियमबाह्य ध्वनिक्षेपकावर कारवाईची मागणी -
गणेशोत्सवाच्या काळात काही सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या आवाजात डीजे, ध्वनिक्षेपक व इतर ध्वनिवर्धक साधनांचा वापर केला जातो. यामुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असल्याचा मुद्दा चौगुले यांनी उपस्थित केला आहे. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करण्यात यावा, अशी त्यांची भूमिका आहे.
त्याचबरोबर शहरातील विविध रस्त्यांवर गणेश मंडळांकडून मंडप, कमानी, सजावट, खुर्च्या व अन्य साहित्य उभारण्यात येते. त्यामुळे काही ठिकाणी रस्ते अरुंद होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने किंवा इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस व प्रशासनाने नियमांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी चौगुले यांनी निवेदनातून केली आहे.
शेकडो वर्षांची उत्सवपरंपरा खंडित करू नका -
दरम्यान, नगरसेवक परशुराम मोरे यांनी या मागणीला विरोध करत गणेशोत्सव हा श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असल्याचे म्हटले आहे. गणपती उत्सवाची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. उत्सवाच्या काळात गणेश मंडळांवर सरसकट कारवाई करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. गणेश मंडळांवर कारवाई करण्याचा प्रयत्न झाल्यास आपण त्याविरोधात उपोषणाला बसू, असा इशारा मोरे यांनी दिल्याने या विषयाला राजकीय व सामाजिक रंग मिळण्याची शक्यता आहे.
नियमही हवेत, उत्सवाची परंपराही जपली पाहिजे -
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, यासाठी मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. त्याचवेळी उत्सवाच्या नावाखाली सर्वच मंडळांवर सरसकट कारवाई न करता, प्रत्यक्ष नियमभंग करणाऱ्या मंडळांवरच योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
आता पोलिस प्रशासन या दोन्ही बाजूंचा विचार करून ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक सुरक्षिततेचे नियम काटेकोरपणे राबवते की गणेश मंडळांना काही सवलत देते, याकडे जत शहराचे लक्ष लागले आहे.

