yuva MAharashtra कोळगिरी येथे ग्राम सर्वेक्षण | सामाजिक, आर्थिक व विकासात्मक स्थितीचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अभ्यास

कोळगिरी येथे ग्राम सर्वेक्षण | सामाजिक, आर्थिक व विकासात्मक स्थितीचा विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष अभ्यास

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी ;
        ग्रामीण जीवन, सामाजिक रचना आणि विकासाची वास्तविकता प्रत्यक्ष अनुभवत तिचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या उद्देशाने राजे रामराव महाविद्यालय, जत येथील भूगोल विभागाच्या वतीने मौजे कोळगिरी येथे ग्राम सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात भूगोल विभागातील तब्बल ३० विद्यार्थ्यांनी विभाग डॉ.सोमनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गावातील सामाजिक व आर्थिक स्थितीचा प्रत्यक्ष अभ्यास केला.
         ग्राम सर्वेक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, भौगोलिक तसेच विकासात्मक विविध पैलूंची माहिती संकलित केली. प्रत्यक्ष क्षेत्रभेटीच्या माध्यमातून मिळालेल्या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण समाजजीवन, स्थानिक संसाधने, लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, आर्थिक परिस्थिती आणि गावाच्या विकासाच्या गरजा यांचा अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली.
        भूगोल विभागप्रमुख डॉ.सोमनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ.प्रफुल्ल गायकवाड, प्रा.लक्ष्मण मासाळ आणि प्रा.सुशांत तांदळे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण पद्धतीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. या ग्राम सर्वेक्षणाचे समन्वयक म्हणून डॉ.प्रफुल्ल गायकवाड यांनी जबाबदारी सांभाळली. यावेळी कोळगिरी गावाचे उपसरपंच श्री. वसंत कांबळे यांनी विद्यार्थ्यांना गावातील विविध शैक्षणिक, सामाजिक, भौगोलिक व विकासात्मक बाबींविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना गावाच्या सद्यस्थितीचा अधिक व्यापक दृष्टिकोनातून अभ्यास करता आला. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभवाची जोड देणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी ‘गाव समजून घेताना समाज समजून घेणे’ या संकल्पनेचा अनुभव घेतला. अशा प्रकारच्या क्षेत्रीय सर्वेक्षणातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, माहिती संकलन, विश्लेषण व संशोधनवृत्तीला चालना मिळत असून, महाविद्यालयाची शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होत आहे. ग्रामीण वास्तवाचा अभ्यास, विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीचा विकास आणि समाजाशी शैक्षणिक नाते दृढ करणारा हा ग्राम सर्वेक्षण उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.