जत | प्रतिनिधी ;
जतचे संस्थानिक श्रीमंत रामराव महाराज डफळे यांची पुण्यतिथी 'रामराव डे' सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात व जत तालुक्यात मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यापारी व राज्य कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री.शशिकांत काळगी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.कृष्णा रानगर होते.
यावेळी बोलताना श्री.शशिकांत काळगी म्हणाले की, श्रीमंत रामराव महाराज हे जतच्या इतिहासातील लोकहिताचा विचार करणारे दूरदृष्टीचे संस्थानिक होते. त्यांच्या कार्यामुळे जतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीला नवी दिशा मिळाली. त्यांच्या स्मृती जपणे ही केवळ परंपरा नसून पुढील पिढीला आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे कार्य आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले कि, आजच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसराचा इतिहास, थोर व्यक्तींचे योगदान आणि सामाजिक परिवर्तनाची परंपरा समजून घेतली पाहिजे. इतिहासातून प्रेरणा घेऊन वर्तमानात सकारात्मक कार्य करण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असेही ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रा.कृष्णा रानगर म्हणाले की, श्रीमंत रामराव महाराज यांची पुण्यतिथी 'रामराव डे' म्हणून साजरा करण्यामागे त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि विद्यार्थ्यांना जतच्या इतिहासाशी जोडणे हा मुख्य उद्देश आहे. एखाद्या प्रदेशाचा इतिहास हा केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नसतो, तर तो वर्तमानाला दिशा आणि भविष्याला प्रेरणा देणारा असतो, असे सांगून ते पुढे म्हणाले की, महाविद्यालयाचे नाव ज्या श्रीमंत रामराव महाराजांच्या स्मृतीशी जोडलेले आहे, त्यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे ही आपली शैक्षणिक व सांस्कृतिक जबाबदारी असून विद्यार्थ्यांनी आपल्या इतिहासाचा अभिमान बाळगूळ सामाजिक बांधिलकी आणि लोककल्याणाची भावना जोपासली पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत रामराव महाराज, शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचे स्वागत प्राचार्य कृष्णा रानगर व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ यांया हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी तर शेवटी आभार प्रा.रोहिणी शिंदे यांनी मानले.

