yuva MAharashtra कु. प्रज्ञा काटे यांना ‘गुरुवर्य युवारत्न पुरस्काराने’ सन्मानित | विविध विषयांवरील व्याख्यानांतून समाजप्रबोधन

कु. प्रज्ञा काटे यांना ‘गुरुवर्य युवारत्न पुरस्काराने’ सन्मानित | विविध विषयांवरील व्याख्यानांतून समाजप्रबोधन

जत वार्ता न्यूज
By -

जत | प्रतिनिधी :
     जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील युवा व्याख्याती व बी.ए.एम.एस. द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. प्रज्ञा बाबासाहेब काटे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत ‘गुरुवर्य राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान व प्रतिष्ठा फाउंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने सांगली येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र व पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     प्रज्ञा काटे यांनी विविध विषयांवर व्याख्याने देत समाजप्रबोधन व जनजागृतीचे कार्य केले आहे. व्यसनमुक्ती, स्वच्छता, जलसंधारण, आरोग्यविषयक जनजागृती, रक्तदान, सामाजिक बांधिलकी, बालकामगार निर्मूलन, ‘लेक वाचवा’ अभियान आदी विषयांवर व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी समाजात जागृती निर्माण करण्याचे काम केले आहे.
     सामाजिक कार्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक वाटचालीचीही या पुरस्कारासाठी दखल घेण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असताना सामाजिक जाणीव जपत त्यांनी विविध सामाजिक विषयांवर प्रबोधनाचे कार्य सुरू ठेवले आहे.
     यापूर्वीही कु. प्रज्ञा काटे यांना त्यांच्या कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमधील यश, उत्कृष्ट युवा व्याख्याती म्हणून मिळालेले सन्मान तसेच सामाजिक उपक्रमांतील सहभागाची दखल घेत त्यांना विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत.
     या पुरस्कार सोहळ्यास अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष कर्नल हेमंत जोशी, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीपआप्पा कदम, संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप साळुंके, ॲक्ट्रॉनिक्स टेक्नो प्रा. लि.चे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. मारुती पवार, प्राचार्य एम. एस. राजपूत, प्रा. रोहित पाटील, पत्रकार जितेंद्र कांबळे, सुरेंद्र कांबळे, फॉरेस्ट ऑफिसर बाबासाहेब गायकवाड आणि बाबासाहेब काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
     कु. प्रज्ञा काटे या स्टॅम्प व्हेंडर बाबासाहेब काटे यांच्या कन्या आहेत. त्यांच्या या सन्मानाबद्दल जाडरबोबलादसह जत तालुक्यातून अभिनंदन होत आहे. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
समाजप्रबोधनाचा ध्यास - 
     वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही प्रज्ञा काटे यांनी विविध सामाजिक विषयांवर व्याख्यानांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य सुरू ठेवले आहे. युवा पिढीने सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.