जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राजे रामराव महाविद्यालय, जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी डॉ. लक्ष्मण भरगंडे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुणाईसाठी किती महत्त्वाचे आहेत, आत्मविश्वास, शिस्त, राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिर्मिती यांचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.
उद्घाटन समारंभात विद्यार्थ्यांनी निर्मित केलेल्या ‘वेळ’ या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या लघुपटातून वेळेचे महत्त्व, नियोजन व जबाबदारी यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. विशाल गोडबोले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग तसेच गुरुदेव कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व वैचारिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा उद्देश असल्याचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी सांगितले.

