yuva MAharashtra जत जिल्हा घोषित करा व शक्तीपीठ महामार्ग जत तालुक्यातून घ्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा; अमित दुधाळ, शिवसेनेकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

जत जिल्हा घोषित करा व शक्तीपीठ महामार्ग जत तालुक्यातून घ्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा; अमित दुधाळ, शिवसेनेकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत तालुका भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठ्या तालुक्यांपैकी एक असून कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीला सामोरा जात आहे. मात्र आजतागायत या तालुक्याचा अपेक्षित विकास झालेला नाही. दळणवळण, रोजगार व प्रशासकीय सोयींच्या अभावामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत जत तालुका जिल्हा घोषित करावा व शक्तीपीठ महामार्ग जत तालुक्यातून घ्यावा, अशा दोन महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन शिवसेना उबाठा गटाचे जत तालुकाप्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ यांचे वतीने उपविभागीय अधिकारी अजयकुमार नष्टे यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
     निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवस्थानांच्या माध्यमातून प्रस्तावित असलेला शक्तीपीठ महामार्ग सध्या जत तालुक्याच्या सीमेलगतून जात आहे. हा महामार्ग जर थेट जत तालुक्यातून नेण्यात आला, तर तालुक्यातील अनेक तीर्थक्षेत्रे या मार्गाशी जोडली जातील. त्यामुळे दळणवळण सुलभ होऊन पर्यटनास चालना मिळेल तसेच स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्यास मोठी मदत होईल.
     याशिवाय जत तालुका सांगली जिल्ह्यातील सर्वात लांबचा तालुका असल्याने येथील नागरिकांना शासकीय कामकाजासाठी दूरवर जावे लागते. यामुळे वेळ आणि पैशाचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. गोवा राज्याच्या धर्तीवर नवीन जिल्हा निर्मितीचे शासनाचे धोरण लक्षात घेता, त्यामध्ये जत तालुक्याचा समावेश करून स्वतंत्र जत जिल्हा घोषित करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
     निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला असून, वरील दोन्ही मागण्यांबाबत शासनाकडे तातडीने पाठपुरावा करून लवकरात लवकर निर्णय जाहीर न झाल्यास, येत्या काळात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.