जतवार्ता न्यूज नेटवर्क;
गोरगरीब जनतेच्या हितासाठीच आमचे राजकारण असून जत शहराच्या सर्वांगीण व अपेक्षित विकासासाठी भाजपचे नूतन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत. जनतेने दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा ठाम विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.
जत येथील श्री यल्लम्मा देवी मंदिर परिसरात पार पडलेल्या भाजपच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी नूतन नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी व त्यांच्या पत्नी डॉ. रेणुका आरळी यांचा आ. पडळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आ. पडळकर म्हणाले, कालच म्हैसाळ योजनेच्या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला असून ही योजना अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत जत तालुक्याच्या पूर्व भागातील तब्बल सतरा तलाव म्हैसाळ योजनेच्या पाण्याने भरून काढण्याचा संकल्प आहे. याचबरोबर संख मध्यम प्रकल्पातही हे पाणी जाणार असून त्या अंतर्गत येणाऱ्या निम्म्याहून अधिक गावांचा पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
“श्री यल्लम्मा देवीच्या पायावरून कृष्णेचे पाणी पुढे जाईल,” असे देवीच्या साक्षीने जतकरांना वचन देत आ. पडळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवी तसेच अंबाबाई देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास वन विभागाच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासोबतच तालुक्यातील सर्व मंदिरांचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
पर्यटनाच्या दृष्टीने जत शहराचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगत आ. पडळकर म्हणाले, शहराजवळ शंभर एकर जागेवर भव्यदिव्य प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून लवकरच याला मंजुरी मिळणार असून पहिल्या टप्प्यात १०६ कोटी रुपयांची तरतूद आहे. पुढील काळात हा निधी १५० कोटींपर्यंत वाढेल. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव प्राणी संग्रहालय जत शहरात साकार होणार असून त्यामुळे जत पर्यटन नकाशावर ठळकपणे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी नूतन नगरसेवक राजकुमार साळे, लक्ष्मीबाई कैकाडी, डॉ. प्रमोद हिरवे, विना तंगडी, सीमा पट्टनशेट्टी, गौतम ऐवळे, प्रणिता यादव, संगीता सोनुले, विक्रम ताड, नंदिनी मठपती, मिथुन भिसे, फिरोज नदाफ, परशुराम मोरे यांच्यासह निवडणुकीत पराभूत झालेले रवी मानवर, संतोष मोटे, सुभाष कांबळे, प्रवीण वाघमोडे, हेमलता चव्हाण, नीलेश मटगार, रंजना बाबर, शारदा कुंभार, स्वप्ना स्वामी, पावन कुंभार यांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास आमदार सदाभाऊ खोत, श्रीमंत शार्दूलराजे डफळे, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी, आकाराम मासाळ, सुनील पवार, सरदार पाटील, संजय तेली, रामन्ना जीवनावर, डॉ. हिट्टी, संजीव सावंत, अभिजित चव्हाण, आप्पासाहेब नामद, अण्णा भिसे, डॉ. वैभव ताड, नाथाभाऊ पाटील, श्रीमंत तांबे, दिग्विजय चव्हाण, अतुल मोरे, बाळासाहेब हुंचाळकर, सुभाष गोब्बी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

