yuva MAharashtra संख जिल्हा परिषद व गिरगांव पंचायत समिती गणात शिवसेना ठाकरे गटाकडून बागेळी-पाटील यांची अधिकृत उमेदवारी दाखल

संख जिल्हा परिषद व गिरगांव पंचायत समिती गणात शिवसेना ठाकरे गटाकडून बागेळी-पाटील यांची अधिकृत उमेदवारी दाखल

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     संख जिल्हा परिषद गटातून ललिता बागेळी-पाटील तसेच गिरगांव पंचायत समिती गणातून विजय बागेळी-पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाकडून अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी व शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
     गिरगांव पंचायत समिती गणातून उमेदवार असलेले विजय बागेळी-पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे जत तालुका विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संघटनात्मक बांधणीसह पक्षवाढीसाठी त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित आहे. शेती क्षेत्रातील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला असून शेतकरी हितासाठी राबवलेल्या उपक्रमांमुळे ते लोकप्रिय झाले आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले असून विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, शैक्षणिक सुविधा व गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रयत्न केले आहेत.
      संख जिल्हा परिषद गटातील उमेदवार ललिता बागेळी-पाटील या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिला, युवक व ग्रामीण विकासाशी संबंधित प्रश्नांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. गावपातळीवरील समस्या, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व महिला सक्षमीकरणासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, विकासाभिमुख व लोकाभिमुख नेतृत्वाला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळणार आहे. बागेळी-पाटील यांच्या माध्यमातून संख व गिरगांव परिसरात विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
     यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका संघटक, अमित दुधाळ व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी व युवा सेनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने संख जिल्हा परिषद व गिरगांव पंचायत समिती गणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणुकीची रंगत वाढली आहे.