जतवार्ता न्यूज नेटवर्क;
सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, पत्रकारिता व सहकार अशा विविध क्षेत्रांत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने सेवा बजावणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे नेतृत्व म्हणून राज्य शासन पुरस्काराने सन्मानित झालेले विजय रुपनूर आता येळवी पंचायत समिती गणातून भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आपल्या कार्यशैलीतून व कामातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली असून, सर्वसामान्यांमध्ये विश्वासाचे भांडवल तयार केले आहे.
जतचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर तसेच जतचे नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांचे विश्वासू सहकारी म्हणून विजय रुपनूर यांची ओळख आहे. येळवी पंचायत समिती गणातून त्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून स्थानिक कार्यकर्ते, नागरिक व विविध सामाजिक घटकांकडून जोर धरत होती. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार गोपीचंद पडळकर व नगराध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनीही विजय रुपनूर यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती.
अखेर भाजपकडून विजय रुपनूर यांच्या उमेदवारीला अधिकृत हिरवा कंदील मिळाल्याने येळवी गणासह संपूर्ण जत तालुक्यात राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय रुपनूर हे केवळ येळवी गणापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जत तालुक्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सामाजिक, शैक्षणिक, कृषी व सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे त्यांनी विविध घटकांमध्ये आपुलकीचे नाते निर्माण केले आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय रुपनूर यांना उमेदवारी देत त्यांच्या कार्याला संस्थात्मक बळ दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येळवी पंचायत समिती गणातील निवडणूक आता अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता असून, नव्या राजकीय समीकरणांना जन्म मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.

