जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत जिल्हा परिषद निवडणुकीत खोजनवाडी पंचायत समिती गणातून भारतीय जनता पक्षाकडून विणा रमेश बिरादार यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला आहे. भाजपच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून खोजनवाडी गणातील राजकीय वातावरण तापले आहे.
विणा बिरादार यांचे पती रमेश बिरादार हे अनुभवी आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिसरात परिचित आहेत. त्यांनी मेंढीगिरी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून सलग पाच वर्षे काम केले असून, त्यानंतर दहा वर्षे मेंढीगिरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच सांगली विष्णू अण्णा फळमार्केटचे सभापती म्हणून अडीच वर्षे कार्य केले आहे.
याशिवाय जत मार्केट कमिटीमध्ये सभापती म्हणून दीड वर्ष काम करत त्यांनी शेतकरी, व्यापारी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही ते नेहमी कार्यरत राहिले असून, विविध विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
रमेश बिरादार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या पायावर विणा बिरादार यांनी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक विकास, महिला सशक्तीकरण, शेतकरी हित आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी काम करण्याचा त्यांचा निर्धार असून, खोजनवाडी गणातील मतदारांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
खोजनवाडी पंचायत समिती गणातील ही लढत रंगतदार ठरण्याची शक्यता असून, विविध पक्षांचे उमेदवार निवडणूक प्रचाराला वेग देत आहेत. विणा बिरादार यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळाली असून आगामी निवडणूक चुरशीची होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

