जतवार्ता न्यूज नेटवर्क :
डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व हे उच्चविद्याविभूषित, सक्षम आणि लढाऊ महिला लोकप्रतिनिधीकडे असावे, अशी तीव्र भावना मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. याच जनभावनेचा आदर राखत तसेच विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या आग्रहाखातर ॲड. राजश्री अमोल पांढरे यांनी डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची अधिकृत घोषणा केली आहे.
ॲड. राजश्री पांढरे या व्यवसायाने वकील असून त्यांनी बी.एस.एल., एल.एल.बी., एल.एल.एम. आणि एम.ए. असे उच्च शिक्षण घेतले आहे. कोल्हापूर येथील शहाजी लॉ कॉलेजमधून त्यांनी बी.एस.एल., एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले असून, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून एल.एल.एम. आणि एम.ए. पदवी संपादन केली आहे. सध्या त्या कोल्हापूर व सांगली न्यायालयात यशस्वी वकिली करीत असून, गोरगरीबांच्या हक्कासाठी लढणारी वकील म्हणून त्यांची ओळख आहे.
डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. मात्र या मतदारसंघात आजही मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई, पक्क्या रस्त्यांचा अभाव, काही ठिकाणी स्मशानभूमी नसणे, एस.टी. बससेवेचा अभाव, शाळांसाठी अपुऱ्या खोल्या व शिक्षकांची कमतरता असे गंभीर प्रश्न आहेत. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, बाजारपेठा, ग्रामपंचायत इमारती, बहुउद्देशीय सभागृहे, पुल, पशुवैद्यकीय सेवा तसेच विविध शासकीय कार्यालयांतील रिक्त पदे यांसारख्या पायाभूत प्रश्नांमुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शासनाच्या विविध योजना असूनही त्या प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याने निधी खर्च न होता परत जाण्याचे प्रकार घडत आहेत. विकासकामांतील भ्रष्टाचार, नियोजनाचा अभाव आणि सक्षम नेतृत्व नसल्याने जनतेची कामे वर्षानुवर्षे रखडलेली आहेत. त्यामुळे सभागृहात ठामपणे प्रश्न मांडणारे, अधिकार्यांना जाब विचारणारे, गरज पडल्यास आंदोलनाची भूमिका घेणारे आणि कायद्याची जाण असलेले नेतृत्व आज काळाची गरज बनली आहे. ही भूमिका ॲड. राजश्री पांढरे समर्थपणे पार पाडू शकतील, असा विश्वास जनतेत व्यक्त होत आहे.
अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांसारख्या महापुरुषांच्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या सामाजिक व राजकीय वाटचालीत जपला आहे.
सामाजिक कार्यकर्ते व परखड पत्रकार म्हणून ओळख असलेल्या अमोल पांढरे यांच्या सामाजिक-राजकीय कार्यात त्या नेहमीच खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत. ओबीसी आरक्षण, वंचित-बहुजन हक्क, धनगर समाजाचे प्रश्न, मेंढपाळांचे अधिकार, सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा जपण्याच्या चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. यशवंत सेना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या उभारणीतही त्यांनी योगदान दिले आहे.
स्वावलंबन, शिक्षण आणि संघटन या त्रिसूत्रीवर आधारित विकासाची भूमिका मांडत महिला, युवक-युवती, शेतकरी आणि शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा त्यांचा निर्धार आहे. भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ व पारदर्शक कारभार हेच आपले व्हिजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ॲड. सौ. राजश्री पांढरे यांच्या उमेदवारीच्या घोषणेनंतर डफळापूर मतदारसंघासह जत तालुक्यातून त्यांचे जोरदार स्वागत होत आहे. एक सुशिक्षित, सक्षम आणि उच्चविद्याविभूषित महिला उमेदवार मैदानात उतरल्याने मतदारसंघातील जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

