yuva MAharashtra जत तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा एकत्रित निर्धार; भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व रासप एकत्र

जत तालुक्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा एकत्रित निर्धार; भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उबाठा) व रासप एकत्र

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जत तालुक्यात भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय माजी आमदार विलासराव जगताप व माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त पत्रकार बैठकीत घेण्यात आला.
     या बैठकीत बोलताना माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, भाजपकडून पैसा, दादागिरी व जातीवादाचे घाणेरडे राजकारण सुरू असून ते जत तालुक्यातील जनतेला मान्य नाही. सर्व पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात एकास एक उमेदवार दिल्यास विजय निश्चित होईल, अशी भावना सर्व पक्षांच्या नेतेमंडळींसह मतदारांमध्ये आहे. त्यामुळे सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून भाजपविरोधात एकसंघ पॅनल उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागावाटपाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल आणि एकत्रित ताकदीने भाजपचा पराभव पक्का करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
     माजी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले की, जत तालुक्यातील तमाम जनता व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन, तसेच तालुक्याच्या विविध प्रश्नांच्या हिताच्या दृष्टीने जातीवादी राजकारणाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आले आहेत. देश, राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर भाजपकडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून तो थांबवण्यासाठी ही निवडणूक एकत्रितपणे लढवली जाईल. या पॅनलला जत तालुक्यातील जनता निश्चितपणे भरघोस पाठिंबा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
     तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेची दिशाभूल थांबवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले असून, एकजुटीने लढल्यास भाजपचा पराभव अटळ आहे, असे मत उपस्थित सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.
     या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे कुंडलिक दुधाळ, तम्मनगौडा रवीपाटील, प्रमोद सावंत, संग्राम जगताप, काँग्रेसचे जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब कोडग, तालुकाध्यक्ष महादेव पाटील, अप्पराय बिराजदार, युवराज निकम, मारुती पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, रमेश पाटील, शिवसेना (उबाठा)चे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ, विधानसभा प्रमुख विजय बागेळी, रासपचे अजित पाटील व किसन टेंगले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या निर्णयामुळे जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची राजकीय लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.