yuva MAharashtra राजे रामराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आयोजित फूड स्टॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राजे रामराव महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आयोजित फूड स्टॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
      राजे रामराव महाविद्यालय, जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्त आयोजित फूड स्टॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता, सर्जनशीलता व व्यवस्थापन कौशल्यांना वाव देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
       या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मविश्वास, स्वावलंबन व कर्मयोगाची प्रेरणा देणारे आहेत. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून जीवनकौशल्ये आत्मसात करता येतात. या कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा.डॉ. ए. के. भोसले, प्रा.कृष्णा रानगर, डॉ.बी. एम. डहाळके, डॉ.शंकर गावडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी केले. त्यांनी फूड स्टॉल स्पर्धेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. फूड स्टॉल स्पर्धेचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ.प्रफुल्ल गायकवाड यांनी प्रभावीपणे केले. या स्पर्धेत विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पारंपरिक तसेच आधुनिक खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल्स उभारले. स्वच्छता, सादरीकरण, चव, नावीन्य व व्यवस्थापन या निकषांवर परीक्षकांनी स्टॉल्सचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.रेश्मा लवटे यांनी आभार प्रदर्शन केले. या यशस्वी आयोजनामुळे स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहातील उपक्रमांना अधिक रंगत प्राप्त झाली असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व संघभावना वृद्धिंगत झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. फूड स्टॉल स्पर्धेला विद्यार्थी व गुरुदेव कार्यकर्त्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.