जतवार्ता न्यूज नेटवर्क-
कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र चिंचली येथील प्रसिद्ध मायाक्का देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तारखेत बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सध्या दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी नियोजित असलेल्या या निवडणुका दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात याव्यात, अशी मागणी जतचे आमदार गोपीचंद पडळकर व ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाशअण्णा शेंडगे यांनी केली आहे.
या मागणीची दखल घेत उपजिल्हाधिकारी सांगली (महसूल) तथा जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेशी संबंधित अधिकारी सतीश कदम यांनी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी यांना पत्राद्वारे अधिकृत विचारणा केली आहे. मायाक्का देवी यात्रेसाठी सांगली जिल्ह्यासह परिसरातील हजारो भाविक मोठ्या संख्येने कर्नाटकात जात असल्याने मतदान प्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो, तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय विचाराधीन आहे.
पत्रात कदम यांनी या संदर्भात तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यात्रेच्या कालावधीत होणारी गर्दी, पोलिस बंदोबस्ताची गरज, वाहतूक व्यवस्थेवरील ताण आणि मतदान टक्केवारीवर होणारा संभाव्य परिणाम यांचा अभ्यास करून अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संभाव्य तारीख बदलाच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदार यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सादर करणार्या अहवालानंतरच अंतिम निर्णय जाहीर होणार असून, त्याबाबत अधिकृत आदेशाची प्रतीक्षा सर्व स्तरांतून केली जात आहे.

