जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तसेच नुकत्याच पार पडलेल्या जत नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयामुळे सत्ताधारी गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा लढती अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी सर्व जागा स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतल्याने सत्ताधारी गटातही थेट सामना पाहायला मिळणार आहे. स्वतंत्र लढतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी मतविभाजनाचा फटका बसतो का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दुसरीकडे, विरोधी पक्षांनी एकत्र येत मजबूत आघाडी उभारली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) यांनी निवडणुकीसाठी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी गटाला रोखण्यासाठी ही व्यापक आघाडी निर्णायक ठरेल, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी, बैठका, संपर्क दौरे आणि मतदारसंघनिहाय रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे. ग्रामपातळीवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चांना उधाण आले असून कोणत्या गटाला किती जागांवर संधी आहे, याचे गणित मांडले जात आहे.
एकीकडे सत्ताधारी गटांचा मागील निवडणुकांतील विजयाचा दावा, तर दुसरीकडे व्यापक आघाडीची एकजूट — अशा परिस्थितीत जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत उमेदवारी जाहीर होण्याबरोबरच प्रचाराला अधिक गती येणार असून, तालुक्यातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषद गट आरक्षण;
▶ जाडरबोबलाद- सर्वसाधारण (महिला)
▶ उमदी - अनुसूचित जाती
▶ संख- सर्वसाधारण (महिला)
▶ दरीबडची- सर्वसाधारण
▶ मुचंडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग
▶ शेगाव- नागरिकाचा मागास प्रवर्ग
▶ डफळापूर- सर्वसाधारण (महिला)
▶ बिळूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
▶ बनाळी - सर्वसाधारण
जत पंचायत समिती गण आरक्षण;
▶ जाडरबोबलाद- सर्वसाधारण (महिला)
▶ माडग्याळ- सर्वसाधारण (महिला)
▶ उमदी - सर्वसाधारण (महिला)
▶ करजगी - अनुसूचित जाती
▶ संख- नागरिकांचा मागास प्रवर्ग
▶ गिरगाव- सर्वसाधारण
▶ दरीबडची- सर्वसाधारण
▶ तिकोंडी- नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला)
▶ मुंचडी - सर्वसाधारण (महिला)
▶ खोजनवाडी - सर्वसाधारण (महिला)
▶ शेगाव - सर्वसाधारण
▶ कोसारी - सर्वसाधारण (महिला)
▶ डफळापूर - नागरिकाचा मागास प्रवर्ग
▶ बाज - नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला)
▶ बिळूर - सर्वसाधारण
▶ उमराणी - अनुसूचित जाती (महिला)
▶ बनाळी - सर्वसाधारण
▶ येळवी- सर्वसाधारण
या गटात, गणात महिलराज;
जाडरबोबलाद, संख, डफळापूर व बिळूर या चार गटात तर जाडरोबलाद, माडग्याळ, उमदी, तिकोडी, मुंचडी, खोजनवाडी, कोसारी, बाज व उमराणी या नऊ गटात महिलराज येणार आहे.
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला;या निवडणुकीत आ. गोपीचंद पडळकर, माजी आमदार विलासराव जगताप, विक्रमसिंह सावंत यांच्यासह प्रत्येक गट व गणातील, गावातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे विजयी वारे सुरू असल्याने व नुकत्याच झालेल्या जत नगरपरिषद निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या यशाने भाजपमध्ये उडी मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा व रासप हे निवडणुकीत एकत्र आले आहेत. तर शिंदे सेना देखील सर्व जागा स्वबळावर लढणार आहे. या सगळ्यात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अपक्ष, बंडखोरी करणाऱ्यास प्रचाराचा कालावधी हा बोटावर मोजण्याइतकाच आहे. २५ हजाराहून अधिक मतदारांपुढे जाण्याचे आव्हान उमेदवारांच्या पुढे असताना इच्छुकांना उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.

