जतवार्ता न्यूज नेटवर्क;
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर केल्या असून येत्या दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. मात्र याच दिवशी कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या श्री. क्षेत्र चिंचली येथील श्री मायाक्का देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस असून देवीच्या बोनी (महानैवैध)चा विधी संपन्न होणार आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश आदी विविध राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र चिंचली मायाक्का देवीच्या यात्रेला दरवर्षी प्रचंड गर्दी उसळते. विशेषतः बोनीच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने चिंचली येथे उपस्थित राहत असल्याने जत तालुक्यासह सीमावर्ती भागातील अनेक गावांतील मतदार या यात्रेसाठी प्रवास करत असतात.
यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानावर निश्चितच परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक मतदार यात्रेच्या कारणास्तव मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता असून, मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करताना यात्रेचा कालावधी लक्षात घेतला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. तसेच यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन आणि मतदान यंत्रणेवरही अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असून, प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दरम्यान, भाविकांची श्रद्धा आणि लोकशाहीतील मतदानाचा हक्क या दोन्ही बाबींचा समतोल राखण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुज्ञ नागरिक व विविध संघटनांकडून केली जात आहे.
चिंचली मायाक्का देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आणि जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचे मतदान एकाच दिवशी येत असल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर हे राज्य निवडणूक आयोगाला पत्र देणार असल्याची माहिती.

