yuva MAharashtra ‘मिशन झेडपी’साठी आ. गोपीचंद पडळकर ॲक्शन मोडवर; जतसह चार तालुक्यांवर लक्ष, नऊ विरुद्ध शून्यचा निर्धार

‘मिशन झेडपी’साठी आ. गोपीचंद पडळकर ॲक्शन मोडवर; जतसह चार तालुक्यांवर लक्ष, नऊ विरुद्ध शून्यचा निर्धार

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क;
     जत नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच ऐतिहासिक विजय मिळवून देत राजकीय ताकद सिद्ध करणारे आमदार गोपीचंद पडळकर आता थेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मकर संक्रांतीनिमित्त त्यांनी जत गाठत ‘मिशन झेडपी’चा बिगुल फुंकला असून, “नऊ विरुद्ध शून्य” हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ताकदीने कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या आवाहनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
     गेल्या दहा दिवसांत राज्यभर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात धडाकेबाज उपस्थिती लावल्यानंतर आ. पडळकर थेट जत तालुक्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी विकासाच्या काही ‘गोड बातम्या’ देत विविध गटांतील संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. गावोगावच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून स्थानिक प्रश्न, राजकीय गणिते व संघटनात्मक ताकद यांचा सविस्तर आढावा घेतला.
     २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ‘विकासपुत्र’ या टॅगलाईनखाली विजय मिळवलेल्या आ. पडळकरांनी त्याच वेगाने जतेच्या विकासाला गती दिली आहे. नवनव्या योजना, संकल्पना आणि विकासाचे ‘रोल मॉडेल’ सरकारसमोर ठेवत त्यांनी जत मतदारसंघाला सातत्याने चर्चेत ठेवले आहे. त्यामुळे विरोधकांची रणनिती वारंवार अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेस व समविचारी पक्षांतील मतैक्याचा अभाव भाजपच्या पथ्यावर पडत असल्याचे जत पालिकेच्या निकालातून स्पष्ट झाले.
     दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेवर एकहाती भाजपची सत्ता आणण्याची महत्त्वाची जबाबदारी वरिष्ठांकडून आ. पडळकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जत, आटपाडी, खानापूर आणि कवठेमहांकाळ या तालुक्यांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून, जतच्या बाबतीत आजही त्यांची रणनिती आघाडीवर असल्याचे दिसून येते.
     गेल्या दोन महिन्यांत त्यांनी दोन सर्व्हे करून राजकीय स्थितीची चाचपणी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना आपल्या गळाला लावत संघटन मजबूत केले. ज्या पद्धतीने जत पालिकेसाठी विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ मांडली, तोच फॉर्म्युला जिल्हा परिषद व पंचायत समितीत राबवण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीला बसणार मोठे धक्के;
     प्रखर आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आ. पडळकर जतच्या राजकारणात मात्र संयम व गोपनीयतेचे तंत्र अवलंबित आहेत. “मला विरोधकांकडे नाही, तर जतच्या विकासाकडे पाहायचे आहे,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या गडांतील अनेक दिग्गजांना नकळत आपल्या बाजूने वळवले आहे. शेगाव, डफळापूर, बनाळी, दरिबडची, जाडर-बोबलाद, उमदी आदी गटांतील गुणवत्ताधारक उमेदवार व दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांशी संधान साधून त्यांनी निवडणुकीची गणिते बदलली आहेत. काही ठिकाणी धक्कादायक उमेदवार देत प्रस्थापितांना बाजूला सारून विस्थापितांना संधी देण्याचे डावपेचही आखले आहेत.
     एकूणच, जत पालिकेच्या विजयाचा ‘इफेक्ट’ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ठळकपणे जाणवत असून, ‘मिशन झेडपी’त आ. गोपीचंद पडळकर यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे सध्याचे राजकीय चित्र आहे.