जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान दिनांकाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा व जनभावनांशी संबंधित मुद्दा आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणला आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी हा मतदान दिनांक जाहीर केला असून, याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस आहे.
श्री मायाक्का देवीच्या यात्रेसाठी सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चारही जिल्ह्यांतून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हजारो बैलगाड्या तसेच लाखो भाविक सहभागी होत असतात. यात्रेचा मुख्य दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्याने या दिवशी भाविक मोठ्या संख्येने यात्रास्थळी उपस्थित राहत असतात. त्यामुळे जर याच दिवशी मतदान घेण्यात आले, तर या चारही जिल्ह्यांतील मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घटण्याची गंभीर शक्यता असल्याची बाब आमदार पडळकर यांनी निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिली आहे.
या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाचे मा. आयुक्त व मा. सचिव यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर केले आहे. याबाबत आज मुंबई येथे निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारेही या विषयावर सखोल संवाद साधण्यात आला आहे.
लोकशाहीतील मतदान हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, तो कोणत्याही कारणामुळे बाधित होऊ नये, तसेच जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग सुनिश्चित व्हावा, या उद्देशाने निवडणूक आयोगाकडून सकारात्मक व योग्य तो मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. याअनुषंगाने सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून तात्काळ अहवाल मागविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या सर्व अहवालांचा अभ्यास करून लोकशाहीचा व्यापक सहभाग अबाधित ठेवणारा व मतदारांच्या भावनांचा आदर करणारा सकारात्मक निर्णय निवडणूक आयोगाकडून घेतला जाईल, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

