जतवार्ता न्यूज नेटवर्क;
मुचंडी जिल्हा परिषद गटासाठी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून रमेश देवर्षी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत रमेश देवर्षी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा कार्यकर्ते व राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
रमेश देवर्षी हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, सामान्य नागरिकांशी त्यांचा थेट संपर्क आणि प्रश्न सोडविण्याची भूमिका यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. गावपातळीवरील प्रश्न, पाणीटंचाई, रस्ते, शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांना विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
भाजप पक्ष संघटनेतही रमेश देवर्षी यांना सक्षम, अभ्यासू आणि लोकसंपर्क असलेले नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे मुचंडी गटात भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यास निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांकडूनही या चर्चेची दखल घेत रणनीती आखण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
सध्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, रमेश देवर्षी यांच्या नावाने सुरू असलेली वादळी चर्चा पाहता मुचंडी जिल्हा परिषद गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या काळात पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या चर्चेमुळे स्थानिक राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

