जतवार्ता न्यूज नेटवर्क;
जत तालुक्यात मागील पावसाळ्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे व जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाकडून अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले नसून, ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांनाही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब यांचे अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी अजयकुमार नसते यांना निवेदन देत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अतिवृष्टीमुळे एकूण किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, किती पंचनामे पूर्ण झाले, किती शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई देण्यात आली आणि किती अर्ज अद्याप प्रलंबित आहेत, याची सविस्तर माहिती तात्काळ जाहीर करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी मन्सूर खतीब तालुकाध्यक्ष, विवेक कोकरे - जिल्हा युवक अध्यक्ष, उत्तमशेठ चव्हाण - तालुका कार्याध्यक्ष, सचिन होर्तीकर - युवक अध्यक्ष, प्रतापराव शिंदे, अमोल कराडे, शिवानंद माडग्याळ, शंकरराव गायकवाड, बी आर पाटील, सुवर्णाताई अलगुर, प्रविण चव्हाण आदीजन उपस्थित होते.
निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असूनही अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना तात्काळ व सरसकट मदत देण्यात यावी. अन्यथा शेतकऱ्यांवर अन्याय होणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, जनावरांचे चारा-पाणी, शेती उत्पादन खर्च, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाकडून वेळेत मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांचे हाल अधिक वाढतील, अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे.
प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास दि.७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जत तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असे स्पष्ट करत प्रशासनाने तात्काळ निर्णय घ्यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

