yuva MAharashtra राज्यस्तरीय गौरवासाठी वाळेखिंडी ग्रामपंचायतीची झेप | पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; शनिवारी मुंबईत सत्कार

राज्यस्तरीय गौरवासाठी वाळेखिंडी ग्रामपंचायतीची झेप | पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; शनिवारी मुंबईत सत्कार

जत वार्ता न्यूज
By -

जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत :

     राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जनजागृती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जत तालुक्यातील वाळेखिंडी ग्रामपंचायतीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे. या यशामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
     ग्रामपंचायतीने गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. स्वच्छता मोहिमा, वृक्षलागवड, पाणी संवर्धन, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या पंचमहाभूतांशी संबंधित विविध उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली.
     या सर्वसमावेशक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
     ग्रामपंचायतीच्या या यशामागे सरपंच वसुधा महादेव हिंगमिरे, उपसरपंच सतीश शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी(ग्रामसेवक) महादेव शिलेदार, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थ यांचे सामूहिक योगदान महत्त्वाचे ठरले आहे. पर्यावरण विषयक सातत्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे वाळेखिंडी ग्रामपंचायतीने राज्यात ठसा उमटवला आहे.
     दरम्यान, “हा संपूर्ण गावाचा सन्मान असून ग्रामविकासात व पर्यावरण संरक्षणात सातत्य ठेवण्याचा निर्धार आहे,” असे मत सरपंचांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय सन्मानामुळे गावातील विकासकामांना अधिक चालना मिळेल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

“हा संपूर्ण गावाचा सन्मान” – सरपंच वसुधा हिंगमिरे;
     वाळेखिंडी ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला राज्यस्तरीय गौरव हा एखाद्या व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे, असे प्रतिपादन सरपंच वसुधा हिंगमिरे यांनी केले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी तसेच पर्यावरणप्रेमी ग्रामस्थ यांनी एकजुटीने काम केले असून त्याचेच हे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
     पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वच्छता, वृक्षलागवड, पाणी अडवा–पाणी जिरवा, प्लास्टिकमुक्ती अशा मोहिमांमध्ये महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांनी सक्रिय भूमिका बजावली. पर्यावरणासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानामुळेच गावाला हा मानाचा बहुमान मिळाल्याचे सरपंचांनी स्पष्ट केले.
     “हा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. यापुढेही गावाच्या विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी अधिक जोमाने काम करू,” असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.