yuva MAharashtra मराठा समाज सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी जागा द्यावी

मराठा समाज सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी जागा द्यावी

जत वार्ता न्यूज
By -

उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांच्याकडे राजेंद्र पाटील यांची मागणी
जतवार्ता न्यूज नेटवर्क | जत : 

     जत नगरपरिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष विक्रम ताड यांनी मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने उद्यानासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे जत तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
     राजेंद्र पाटील म्हणाले, तालुक्यात विविध समाजांच्या समाजमंदिरांची उभारणी झाली असताना मराठा समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन नसणे ही खंताची बाब आहे. समाजातील आमदार, खासदार, मंत्री तसेच प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनीही याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी तालुका स्तरावर सांस्कृतिक भवन उभारले गेल्यास समाजबांधवांना मोठी सुविधा मिळेल. त्यासाठी जत नगरपरिषद हद्दीत किमान अर्धा एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
     तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्वतंत्र, सुस्थितीत व कायमस्वरूपी उद्यान उभारण्यासाठी दोन एकर जागा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. यापूर्वी हराळे समाज वसाहतीशेजारील शासकीय ओढापात्रात उद्यान उभारण्यात आले होते; मात्र जागेच्या मालकीच्या वादामुळे त्या उद्यानाकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेले उद्यान अक्षरशः नामशेष झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
     यानंतर सांगली रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाशेजारील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जागेवर नगरपरिषदेने उद्यान विकसित केले. परंतु सध्या देखभालीअभावी त्या ठिकाणची परिस्थिती दयनीय झाली आहे. उद्यानातील लोखंडी साहित्य गंजले असून फलकावरील अक्षरे पुसट झाली आहेत. झाडांची निगा राखली जात नसल्याने हिरवळ नाहीशी झाली आहे. लहान मुलांसाठी बसविण्यात आलेली करमणूक साधने निकामी झाली असून सिमेंट बाकांचीही मोडतोड झाली आहे.
     दरम्यान, संबंधित जागेवर नगरपरिषदेची भव्य इमारत उभारण्याची चर्चा सुरू असल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीत पर्यायी व प्रशस्त दोन एकर जागा तातडीने निश्चित करून नव्याने सुयोग्य उद्यान उभारावे, अशी मागणी राजेंद्र पाटील यांनी केली आहे. या मागण्यांवर नगरपरिषदेची भूमिका काय असेल, याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.